पुढारी ऑनलाईन डेस्क : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणावेळी ( Gyanvapi Masjid survey ) मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले आहे, असा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाने शिवलिंग मिळालेली जागा सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
ज्ञानव्यापी मशिदीजवळ असलेल्या वजूखान्याच्या तलाव व विहिरीत १२ फूट ८ इंचाचे शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाचे मुख नंदीच्या समोर आहे. तसंच, वजूखान्याचे पूर्ण पाणी काढून शिवलिंगाची पाहणी केली आहे, असं हिंदू पक्षकार मोहन यादव यांनी म्हटलं आहे. ( Gyanvapi Masjid survey )
वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्याच्या विनंतीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. कनिष्ठ न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून अलीकडेच ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण मोहिमेला अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सर्वेक्षण थांबवून परिस्थिती पूर्ववत ठेवावी, अशा विनंतीच्या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. तर त्या आदेशाला मस्जिद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 21 एप्रिल त्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कोर्ट कमिशनरने आपले काम सुरू केले होते.
हेही वाचा :