पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकीय इतिसाहासातील काही बंडखोरीच्या दाखल्यांची आठवण बंडखोर शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी करून दिली. सध्याच्या राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, १९७४ साली जशी शिवसेनेत परिस्थिती निर्माण झाली होती आजही काहीशी तशीच परिस्थिती आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हे योग्यच असून, शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं पण, देवेंद्र फडणवीसांच्यासोबत जावू नये, असा मोलाचा सल्ला बंडखोर शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी शिवसेनेविरूद्ध बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंना दिला आहे.
शिवसेनेत ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेना दाबलं गेलं, त्याचप्रमाणे मलाही त्याकाळात दाबलं गेलं होतं. त्यावेळी जर मला दाबलं गेलं नसतं तर, आज शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली असती. आज तुम्हाला आघाडी करण्याची वेळेच आली नसती. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनामय झाला असता. पुढे ते म्हणाले, शिवसेनेत काही शिवसैनिकांना दाबले जात असेल तरी, एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ देऊ नये, कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतचे नेते हे बोगस आहेत. आजपर्यंतच्या सर्व निवडणुका त्यांनी फसव्या पद्धतीने लढवल्या आहेत, म्हणूनच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, पण फडणवीसांसोबत जाऊ नये, असे मत बंडखोर शिवसैनिक बंडू शिंगरेंनी व्यक्त केले आहे.
बंडखोर शिवसैनिक शिंगरे यांनी एका राजकीय प्रसंगाची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे १९७४ सालची पुन्हा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. १९७४ साली कॉम्रेड डांगे यांचे निधन झाल्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार उभा करावा, अशी बंडू शिंगरेसहित सर्व सैनिकांची मागणी होती. परंतु, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना शिवसेनेचा पाठिंबा दिला.
या घटनेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जाऊन बंडू शिंगरे आणि काही शिवसैनिकांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत, हिंदू महासभेचे उमेदवार विक्रम सावरकर यांना उभे केले. अशाप्रकारे शिवसेना स्थापन झाल्यानंतर काही काळातच बंडू शिंगरे यांनी प्रती शिवसेना स्थापन करून शिवसेनेविरूद्ध पाहिलं बंड केलं होतं. यानंतर छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेळोवेळी शिवसेनेविरूद्धबंड केले. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला बंडखोरीची परंपरा ही काही नवीन नसल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ :