

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपले प्रबंधाचे संशोधन प्रबंधापुरते मर्यादित न ठेवता संशोधनाद्वारे तंत्रज्ञान, तसेच डिझाईनचे पेटंट मिळविणे गरजेचे आहे. पेटंट तसेच बौध्दिक मालमत्ता हक्क या विषयी मनामध्ये भीती बाळगू नका. विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपल्या संशोधनाला पेटंटची जोड दिली, तर त्यांच्या संशोधनाचे मूल्य वाढेल.
या करिता त्यांच्यामध्ये पेटंट संस्कृती आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राद्वारे 'बौध्दिक मालमत्ता हक्क' या विषयावरील बुद्धिमंथन कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून भारत सरकारच्या मुंबई येथील वाणिज्य आणि उद्योग विभागाचे पेटंट व डिझाईनचे तज्ज्ञ परीक्षक अतुल खाडे उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सचिन नलावडे आदी उपस्थित होते.
यावेळी तज्ज्ञ परीक्षक अतुल खाडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, पेटंट मिळविण्यासाठी तुम्ही केलेले संशोधन नावीन्यपूर्ण असायला हवे. जास्तीत जास्त विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांनी त्यांच्या संशोधनाला पेटंट कसे मिळेल, हे पाहिले पाहिजे. यावेळी त्यांनी पेटंट कसे फाईल करावे, कॉपीराईट तसेच भौगोलिक इंडिकेशन्स या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महानंद माने यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. सचिन नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार व डॉ. मुकुंद शिंदे होते, तर आयोजक सचिव अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. उत्तम चव्हाण होते. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.