वसई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा आणि विधान परिषदेच्या झालेल्या निवडणूक काळात बहुजन विकास आघाडीसारख्या प्रादेशिक पक्षांचे महत्व दिसून आले. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठीत सर्व राजकीय पक्ष आघाडीवर होते. अचानक विधान परिषद निवडणूक आटोपताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड समोर आले. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीची समिकरणे बदलण्यावर होणार आहे. वसई-विरार पट्ट्यात आणि म्हणाल तर पालघर बोईसर विधानसभा क्षेत्रातदेखील आ. हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे.
वसई-विरार महापालिकेत गेली 10 वर्षे त्यांची सत्ता आहे. शिवाय पालघर जिल्ह्यातील 6 आमदारांपैकी 3 आमदार एकट्या बविआचेच आहेत. मात्र महाविकास आघाडीची सत्ता येताच नगरविकास मंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी बविआच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. आपल्याला धारजिना आयुक्त आणून पालिका प्रशासनावर वचक बसविला होता. त्या माध्यमातून बविआची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
शिवसेना संघटनेत देखील शिवसैनिकांमधून निवडून संघटन वाढीला ज्याचा उपयोग होईल, असा जिल्हाप्रमुख दिला नाही, तर येथील संघटनेवर आपलीच पकड ठेवली. ही परिस्थिती आता बदलणार असून नजीकच्या काळात येणार्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेऐवजी बहुजन विकास आघाडीचे महत्त्व वाढेल, अशी शंका शिवसैनिकच खासगीत व्यक्त करत आहेत. शिवसेनेची सत्ता असतानाही जिल्ह्याचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. पालघरचा एकमेव शिवसेना आमदार शिंदे हे अपल्यासोबत घेऊन गेले असल्याने चर्चांना वेग आला आहे.