पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतलेली नाही. याबाबतचे कोणतेही आदेश गृहविभागाला दिलेले नाहीत. तर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी आज (दि.२५) पत्रकार परिषदेत दिली.
वळसे – पाटील म्हणाले की, राज्यातील आमदारांची सुरक्षा राज्यापुरती मर्यादीत असते. राज्य सरकारला पूर्णपणे बहुमत आहे. राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पोलीस दलाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे वळसे – पाटील यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. शिवसेना पक्षाच्या जवळपास ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदें विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना पहायला मिळत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेले शिवसेना कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात रोष वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून त्यांच्या फलकांना काळे फासण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे. सावंत यांच्या साखर कारखान्याच्या बोर्डालाही त्यांनी काळे फासले. यादरम्यान शिवसैनिकांनी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचलंत का ?