CSK vs SRH : चेन्नई एक्स्प्रेस सुसाट…

CSK vs SRH : चेन्नई एक्स्प्रेस सुसाट...www.pudharinews.
CSK vs SRH : चेन्नई एक्स्प्रेस सुसाट...www.pudharinews.
Published on
Updated on

मुंबई ः वृत्तसंस्था महेंद्रसिंग धोनीने संघाचे सुकाणू हाती घेताच चेन्नई एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. रविवारी त्यांनी सनरायझर्स हैदराबादला 13 धावांनी हादरा दिला आणि नऊ सामन्यांतून तिसर्‍या विजयासह आपली गुणसंख्या सहावर नेली. दुसरीकडे हैदराबादचे नऊ सामन्यांतून दहा गुण झाले आहेत. निकोलस पूरन याने 64 धावांची वादळी खेळी करून सामन्यात रंग भरला. पण हैदराबादला तो विजयी करू शकला नाही. (CSK vs SRH)

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादने 203 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण, त्यांना त्यात यश आले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकांत 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 39 धावांची सुरेख खेळी केली. तसेच कर्णधार विलियम्सनने 47 धावा फटकावल्या. राहुल त्रिपाठीला भोपळाही फोडता आला नाही. एडन मार्करामने झटपट 17 धावा जमवल्या. शशांक सिंगने 15 धावा जोडल्या आणि वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. (CSK vs SRH)

निकोलस पूरन याने एकहाती झुंज दिली. तथापि, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईतर्फे मुकेश चौधरी याने अत्यंत भेदक मारा करून चार गड्यांना तंबूत पाठवून दिले. मिशेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.
त्यापूर्वी सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी केलेल्या 182 धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 202 धावांचा डोंगर रचला. (CSK vs SRH)

चेन्नईने दोन गडी गमावले. शतकाच्या बाबतीत ऋतुराज मात्र दुर्दैवी ठरला. केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले. ऋतुराजने 99 धावा चोपल्या, त्या 57 चेंडूंत. प्रत्येकी अर्धा डझन चौकार अन् षटकारांची आतषबाजी करून उपस्थित रसिकांना त्यांना खूश केले. चेन्नईचा संघ नाबाद दोनशे धावा करेल असे वाटत होते. तथापि, टी. नटराजनचा चेंडू ऋतुराजने हवेत भिरकावला आणि भुवनेश्वर कुमारने ही अनोखी भेट आनंदाने स्वीकारली. कॉन्वेने नाबाद 85 धावांचे योगदान दिले. (CSK vs SRH)

धोनीने 8 धावा केल्या तर माजी कर्णधार रवींद्र जडेजा 2 धावांवर नाबाद राहिला. कॉन्वेने 55 चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने 8 चौकार आणि चार उत्तुंग षटकार चढवले. चेन्नईच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. जोपर्यंत रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद होते, तोपर्यंत चेन्नईचा संघ निस्तेज बनला होता. मात्र, धोनीने संघाचे सुकाणू हाती घेताच चेन्नई मेल वेगाने दौडू लागली आहे. (CSK vs SRH)

सुकाणू धोनीकडे अन् चमत्कार

महेंद्रसिंग धोनी याने संघाचे कर्णधारपद थकलेल्या रवींद्र जडेजाकडून स्वतःकडे घेताच चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त उसळी घेतली आहे. संघात जणू नवचैतन्याचा पूर आला आहे. चेन्नईचे अजून पाच सामने बाकी आहेत. ते सगळे सामने जिंकून त्यातील एक लढत प्रचंड फरकाने जिंकल्यास चेन्नईसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. ही किमया करण्याची क्षमता धोनीमध्ये निश्चितच आहे. कारण, अत्यंत चाणाक्ष आणि धूर्त कर्णधार अशी त्याची जगभर ओळख आहे. (CSK vs SRH)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news