

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात राहुलने आपल्या फलंदाजीत चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. आज झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुल अर्धशतक झळकावून बाद झाला. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने २ शतकेही झळकवली आहेत. (K. L. Rahul)
आयपीएल २०२२ मध्ये के. एल. राहुलची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. त्याने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे अर्धशतक आहे. त्याने या हंगामात २ शतकेही झळकावली आहेत. यासह त्याच्या चालू मोसमात ४०० धावाही पूर्ण झाल्या आहेत. अशी कामगिरी करणारा यंदाच्या हंगामातील जॉस बटलरनंतरचा तो दुसरा खेळाडू बनला आहे. (K.L. Rahul)
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संघाने २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या. यावेळी के एल राहुलसोबत दीपक हुडानेही ५२ धावांची महत्वाची खेळी खेळली. राहुलने ५१ चेंडूत ७७ धावा केल्या. अर्धशतक झळकावताने त्याने ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. लखनौचा सलामीवीर फलंदाज डी कॉकने १३ चेंडूत २३ धावा केल्या. स्टॉइनिसने १६ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्स संघाने यंदा आयपीएलमध्ये प्रथमच खेळत आहे, या स्पर्धेतील अनुभव नसतानादेखील लखनौ संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी संघाने ९ सामने खेळले. त्यापैकी असून ६ सामने जिंकले आहेत. के.एल. राहुलबद्दल बोलायचे तर तो २०१८ पासून आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने आयपीएलच्या ५ मोसमात ३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता. त्यावेळी संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती परंतु राहुलने त्या हंगामात १३ सामन्यात ६३ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या. यामध्ये ६ अर्धशतकांचादेखील समावेश होता. त्या हंगामात राहूलचा स्ट्राइक रेट १३९ इतका होता.
२०१८ पासून के.एल राहुलची कामगिरी पाहिली असता त्याने प्रत्येकवेळी ५०० हून अधिक धावा केल्या. मेगा ऑक्शनमध्ये पंजाबने चांगली कामगिरी करूनदेखील त्याला रिटेन केले नव्हते. मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्याला १७ कोटी रुपये इतकी मोठी किंमत देऊन आपल्या संघात घेतले व संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी राहुलकडे दिली. चालू हंगामात तो सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. २०१८ मध्ये त्याने ६ अर्धशतकांसह ६५९ धावा केल्या. त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १५८ होता. २०१९ मध्ये ५४ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने एक शतक आणि ६ अर्धशतके केली होती. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १३५ इतका होता.
के. एल. राहुलने आयपीएल २०२० मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने ५६ च्या सरासरीने ६७० धावा केल्या. ही त्याची मोसमातील सर्वोत्तम कामगिरी होती, यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १२९ होता. त्याने आयपीएलमध्ये ३७०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि २९ अर्धशतके झळकवली आहेत. त्याने एकूण टी-२० मध्ये ६ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने ६ शतके आणि ५० अर्धशतके केली होती. राहूने ५७ टी-२० सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.