पणजी : राज्यातील पॅराखेळाडूंना अधिक सुविधा पुरविण्याची गरज | पुढारी

पणजी : राज्यातील पॅराखेळाडूंना अधिक सुविधा पुरविण्याची गरज

पणजी : पिनाक कल्लोळी

इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅराटेबल टेनिस स्पर्धेत गोव्याच्या लॉईड फर्नांडिसने रौप्यपदक पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. अपुर्‍या साधन सुविधा आणि प्रतिकूल वातावरण असूनही लॉईडने नेत्रदीपक कामगिरी केली. पदक मिळवल्यानंतर त्यांनी दैनिक ‘पुढारी’सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यासाठी हे पदक जिंकल्यावर तुमच्या भावना काय आहेत?

ही माझी पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा असल्याने अंतिम सामन्यात मी जरा अस्वस्थ होतो. माझा प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा जास्त अनुभवी होता. असे असले तरी मी हिंमत न हरता खेळलो. सुवर्णपदक मिळाले नाही तरी राज्यातर्फे खेळून रौप्यपदक मिळवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

राज्यातील पॅराखेळाडूंना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

गोव्यात पॅराखेळाडूंसमोर आव्हानांचा डोंगर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहुतेक क्रीडा संकुलात पॅराखेळाडूंना व्हीलचेअर नेण्यासाठी वेगळी सुविधा नाही. बहुतेक वेळेस रेल्वेमध्येही अशी सोय नसल्याने विमानाचा खर्चिक प्रवास करावा लागतो. प्रवासाचा सर्व खर्च खेळाडूंनाच उचलावा लागतो. त्यांना आपल्या सोबत एक मदतनीस ठेवावा लागतो. पॅरा खेळाडूंसाठी बाजारात विशेष व्हीलचेअर उपलब्ध आहेत, मात्र त्याही खूपच महाग असतात.

या पदकानंतर राज्यातील पॅराखेळाडूंच्या स्थितीत बदल होईल असे वाटते का?

मी नेहमीच आशावादी असतो. या पदकामुळे पॅराखेळाडूंबद्दल, त्यांना सामोरे जावे लागणार्‍या आव्हानांबद्दल जागृती होऊन काही बदल होतील असे वाटते. पॅरा खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य त्या सुविधा निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. असे झाले तर आम्हाला सरावासाठी दूरच्या स्टेडियमवर जावे लागणार नाही.

सर्वोच्च ध्येय कोणते?

मला अधिकधिक स्पर्धात भाग घ्यायचा आहे, पदके मिळवायची आहेत. ध्येयवादी आयुष्य जगून माझ्या आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मक परिणाम घडवून आणणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे.

Back to top button