कोल्‍हापूर : शाहूवाडीत २ पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; ट्रॅव्हल्स व्यावसायिकासहीत ३ साथीदारांना पोलीस कोठडी | पुढारी

कोल्‍हापूर : शाहूवाडीत २ पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; ट्रॅव्हल्स व्यावसायिकासहीत ३ साथीदारांना पोलीस कोठडी

सरुड, पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील जांबुर येथे दहा-बारा जण मारहाण करीत होते. तातडीने पोलीस मदत हवी असल्याचा ११२ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल आल्यावर दुचाकीवरून घटनास्थळी पोहचलेल्या शाहूवाडी पोलीस ठाण्याकडील २ पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि त्याच्या ३ साथीदारांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 01) दुपारी अडीच वाजता घडला आहे.

याप्रकरणी दिलीपकुमार दत्तात्रय येसादे या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली. त्‍यानुसार संशयित जणांविरुद्ध हाफ मर्डरची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल लक्ष्मण पाटील (रा. सांगोला, जि. सोलापूर), अक्षय महादेव पाटील, रितेश तुकाराम बनसोडे (दोघेही रा. थावडे, ता. शाहूवाडी), विठ्ठल कृष्णात पोळ (रा. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे असून पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीपकुमार दत्तात्रय येसादे हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोलिस अंमलदार (बक्कल क्र. १७७२) म्हणून कर्तव्यावर आहेत. जांबुर (ता. शाहूवाडी) येथील नदीवर दहा-बारा जण मारहाण करीत आहेत, तातडीने पोलीस मदत हवी असल्याचा शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ११२ या टोल-फ्री क्रमांकावर संजय पाटील या व्यक्तीचा कॉल आला. चौकशीसाठी पोलीस अंमलदार येसादे व वरुटे हे दोन पोलिस कर्मचारी दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले. यावेळी आपल्याला मारहाण करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय पाटील यांनी पोलिसांकडे केली. यासाठी पोलीस ठाण्यात येऊन तशी रीतसर फिर्याद देण्याचा सल्ला त्यांना पोलिसांनी दिला.

दरम्यान, चौकशीचे काम आटोपून पोलीस ठाण्याकडे परत निघालेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी जांबुर येथील काळम्मादेवी चौकात अडवून संशयित ट्रॅव्हल मालक अमोल पाटील याने पोलीस अंमलदार येसादे व वरुटे यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. ५० लाखाच्या ट्रॅव्हल्स गाडीचा मालक असल्याची फुशारकी मारत ‘जावा रे ! गाडीतून हत्यारे बाहेर काढा. या पोलिसांचा हाफ मर्डरच करूया’ अशी थेट धमकीच दिली. यावेळी फिर्यादी येसादे यांनी ‘तुमची काही तक्रार असेल तर पोलीस ठाण्यात येऊन ती नोंद करा, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संशयित अमोल पाटील याने पोलिसांच्या अंगावर धावून जात अक्षय महादेव पाटील, रितेश तुकाराम बनसोडे, विठ्ठल कृष्णात पोळ या अन्य साथीदारांच्या मदतीने पोलिसांना धक्काबुक्की व ढकलून दिली.

पोलीस कर्मचारी येसादे व वरुटे यांनी वरिष्ठांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली आणि स्थानिक खाजगी वाहनातून ताब्यातील संशयितांना शाहूवाडी पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दमदाटी करण्याऱ्या अमोल याने माझा भाऊ मोठा वकील आहे, मी पोलीस ठाण्यात येणार नाही तर तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्‍हणाला. काही वेळाने दाखल झालेल्या पोलिस गाडीतून चारही संशयितांना शाहूवाडी पोलिस ठाण्यात आणले. शनिवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली.

संशयितांना पोलिस कोठडी..

दरम्यान पोलिसांनी रविवारी सायंकाळी संशयित आरोपींना रविवारी सायंकाळी शाहूवाडी मलकापूर न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व आरोपींना मंगळवार (ता.३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Back to top button