सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अशा प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर अतिशय दुर्मीळ लुसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला आहे. खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. यास (Indian Fox) इंडियन फॉक्स या नावाने सुद्धा ओळखला जातो.
खोकड हा राखाडी तांबूस रंगाचा प्राणी आहे. परंतु यावर्षी निरीक्षण करत असताना पांढऱ्या रंगाचा खोकड (Fox) दिसून आला. ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा असून शेपटीच्या टोकास काळा रंग आहे असे दिसून आले. यापूर्वी ल्युसिस्टिक रानमांजर व कोल्ह्याची नोंद झाली होती.
पण पांढऱ्या खोकडाचीही भारतातील पहिलीच नोंद आहे. खोकडाच्या पांढऱ्या रंगाच्या दिसण्याचे कारण म्हणजे अनुवंशिक उत्परिवर्तन, दोष (Genetic Mutation) होय. यामध्ये अनेक रंगांच्या रंगद्रव्यांच्या अंशिक किंवा संपूर्ण अभाव असतो. ल्युसिस्टिक खोकड हे पूर्णपणे पांढरे असून पाय, चेहऱ्यावर किंवा पाठीवर गडद खुणा दिसून येतात. खोकड प्रामुख्याने माळरानात, शेतात व खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो. आकाराने खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी ५० ते ६० सेमी इतकी असते. शरीराचा रंग राखाडी तांबूस असतो. दिसायला सडपातळ व लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो.
खोकड हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर व पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य होय. तसेच उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्यामुळे खोकड हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.
-शिवानंद ब. हिरेमठ
सदस्य, वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशन, सोलापूर