पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे. मात्र, दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. 67 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, ही संख्या समाधानकारक नाही. सर्व तज्ज्ञांच्या मते दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या आठवड्यात दुसर्या डोसला प्रतिसाद दिला नाही, तर पुढील आठवड्यातील बैठकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.
शुक्रवारी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले ओमयक्रॉनबद्दल चर्चा सुरू आहे, त्याचा आढाव घेत आहोत. ओमयक्रॉनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. दोन डोस घेतलेल्याना ओमयक्रॉनची भीती नसते आणि त्यामुळे दोन्ही डोस घेतले पाहिजेत. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ७ पैकी ५ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या १० दिवसात लसीकरणाचा वेग वाढला आहे. दैनंदिन ६० हजारापेक्षा जास्त लसीकरण होत आहे. नागरीक अगोदर गंभीर नव्हते. आता नागरिक जागरूक झाले आहेत. दुसऱ्या डोससाठी यंत्रणेला कामाला लावून लसीकरण करून घेण्याच काम करत आहोत. लोकांनी सहकार्य केले नाही,मदत केली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील.
दोन्ही डोस महत्वाचे यासाठी दोन अधिकारी कामाला लावले आहेत. ओमयक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली. त्याचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ. राज्य स्तरावर हा निर्णय घेण्यात येईल बूस्टर डोस बाबत आताच काही बोलणे योग्य नाही. आधी दोन्ही डोस पूर्ण करून त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल. बूस्टर डोसचा निर्णय देशाच्या पातळीवर झाला पाहिजे, सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, एमपीएससीला या सगळ्या परीक्षा घेणं अवघड आहे. हे शासनाने घेतलेले निर्णय स्वीकारले पाहिजेत. ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एवढी कडक कारवाई केली जाईल, की परत कोणी असे करण्याची हिंमत करणार नाही. फुटलेला पेपर रद्द करण्याची मागणी होते आहे; मात्र याबाबत राज्य स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनीस्पष्ट केले.
हेही वाचा