रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने ( IPL 2021 Eliminator ) ४ विकेट्सनी पराभव केला. बेंगलोरचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा यापूर्वीच विराटने केली होती. ( IPL 2021 Eliminator ) आरसीबी एलिमिनेट झाल्यानंतर विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले.
विराट कोहलीने सलग ७ वर्ष आरसीबीचे कर्णधार पद भूषवले. मात्र त्याला एकदाही आयपीएल चषक आपल्या नावावर करता आला नाही. स्वप्नभंग झाल्यानंतर विराट म्हणाला, मी संघात नेहमीच युवा खेळाडूंना आक्रमक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी माझे १२० टक्के प्रयत्न केले. यापुढेही खेळाडू म्हणून माझे हेच प्रयत्न असतील. आम्ही सुरुवात चांगली केली. मात्र यामध्ये सातत्य ठेवू शकलो नाही. आमची फलंदाजी खराब झाली. केकेआरची गोलंदाजी प्रभावी होती. आम्ही धावा कमी केल्या. आमच्या फलंदाजांनी मनमोकळा खेळ केला नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला.
पुढील तीन वर्ष आरसीबीने नवीन संघ बांधणीसाठी प्रयत्न करावेत. मी आरसीबीसाठीच खेळणार आहे. माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. या संघाबरोबर मी शेवटपर्यंत जोडलेला असेन, असेही त्याने स्पष्ट केले.
आमचा पराभव झाला असला तरी संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे. समर्थकांसह सर्वांचे आभार, असेही ट्विट विराटने केले आहे.
केकेआरविरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा पराभव झाला. या पराभवानंतर संघ सहकार्यांशी चर्चा करताना कर्णधार विराट कोहली भावनाविवश झाल्याचे दिसले. विराटला अश्रू अनावर झाले. यावेळी डिविलियर्सलाही रडू कोसळले.
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज अशी विराट कोहलीची ओळख आहे. आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे कोहलीने जाहीर केले आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे कर्णधार पदही सोडणार असल्याचे त्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. विराटने सलग सात वर्ष या संघाचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून त्याचे आयपीएलमधील हे अखेरचे सत्र होते. सोमवारी झालेल्या पराभवामुळे त्याचे आयपीएल चषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.