CSKvsDC IPL 2021 : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये - पुढारी

CSKvsDC IPL 2021 : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये

दुबई ; वृत्तसंस्था : (CSKvsDC IPL 2021)सलामीवीर ऋतुराज गायकवाड (70) आणि रॉबिन उथप्पा (63) यांची झंझावती अर्धशतके आणि कर्णधार महेंंद्रसिंग धोनीचा ‘फिनिशिंग टच’ यांच्या जोरावर ‘आयपीएल – 2021’च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेटस्नी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलची फायनल गाठण्याची ही चेन्नईची नववी वेळ आहे. तर, दिल्लीला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 172 धावा केल्या. चेन्नईने हे आव्हान 2 चेेंडू आणि 4 विकेटस् शिल्लक ठेवून पूर्ण केले. ऋतुराज आणि उथप्पा खेळत असताना सामना चेन्नईच्या हातात होता. परंतु, झटपट विकेट मिळवत दिल्लीने सामन्यात कमबॅक केले. 12 चेेंडूंत 24 धावा असताना सेट झालेला ऋतुराज बाद झाल्याने चेन्नईवरील दडपण वाढले.(CSKvsDC IPL 2021)

चेन्नईला अखेरच्या तीन षटकांत 12 च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. 18 व्या षटकात चेन्नईने 11 धावा केल्या. परंतु, 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने अप्रतिम झेल घेत ऋतुराजला माघारी पाठवले. ऋतुराजने 50 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 70 धावा केल्या. रवींद्र जडेजाऐवजी महेंद्रसिंग धोनी आला. अन् दुसर्‍याच चेंडूवर षटकार खेचला.

चेन्नईला अखेरच्या षटकात 13 धावा हव्या होत्या. टॉम कुरेनने टाकलेला स्लोव्हर चेंडू मोईन अलीने (16) भिरकावला. परंतु, सीमारेषेवर कॅगिसो राबाडाने तो टिपून चेन्नईला धक्का दिला. पुढील दोन चेंडूवर धोनीने चौकार खेचले. चौथा चेंडू वाईड फेकल्याने 3 चेंडूंत 4 धावा असा सामना अटीतटीचा आला. धोनीने चौकार मारून चेन्नईचा विजय पक्का केला. अन् अंतिम फेरीत प्रवेश केला. (CSKvsDC IPL 2021)

तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांना संघाला चांगली सुरुवात करून देता आली नाही. चौथ्या षटकांत हेझलवूडने धवनला (7) बाद केले. दिल्लीला दुसरा धक्काही हेझलवूडनेच दिला. तिसर्‍या स्थानावर बढती मिळालेला श्रेयस अय्यर (1) चुकीचा फटका मारून ऋतुराज गायकवाडच्या हातून झेलबाद झाला. उत्तुंग उडालेला चेंडू ऋतुराजने सुरेख टिपला. अक्षर पटेल फारशी चमक दाखवू शकला नाही. दुसर्‍या बाजूने पृथ्वी चांगला खेळत होता आणि त्याने 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

अक्षरने (10) मोईन अलीच्या गोलंदाजीवर टोलावलेला चेंडू बदली खेळाडू मिचेल सँटेनरने सहज झेलला. यावेळी दिल्लीचा रनरेट खाली घसरला होता, दडपणात पृथ्वीने पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. फाफ-डू-प्लेसिसने सीमारेषेवर सुरेख झेल टिपून 34 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 60 धावा करणार्‍या पृथ्वीला माघारी जाण्यास भाग पाडले.

यानंतर शिमरोन हेटमायर व ऋषभ पंत ही नवी जोडी खेळपट्टीवर आली. या दोघांनीही गिअर बदलताना 9 च्या सरासरीने धावा कुटण्यास सुरुवात केली. या जोडीने 40 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना दिल्लीची रनरेटची गाडीही पुन्हा रुळावर आणली. 19 व्या षटकात हेटमायर 37 धावांवर (27 चेंडू) बाद झाला. ब्राव्होने ही विकेट घेताना टी-20 क्रिकेटमध्ये 550 बळी पूर्ण केले आणि हा पराक्रम करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. ऋषभने शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 35 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 51 धावांवर नाबाद राहिला.

Back to top button