नांदेड हादरले! एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह जंगलात लटकलेल्या अवस्थेत सापडले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

तामसा (जि. नांदेड), पुढारी वृत्तसेवा : लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्यानंतर मुंबई येथून काही दिवसांपूर्वीच गावात आलेले कावळे कुटुंबातील आई आणि मुलाचा निर्घृण खून करण्यात आला असून वडिलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मागील आठ दिवसांपासून हे कुटुंब बेपत्ता होते. आणखी एक मुलगा बेपत्ताच आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना तामशातील पोटा गावातील टाकराळा जंगलात सोमवारी उघडकीस आली. तिघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील तामसा परिसरातील टेंभी गावातील कावळे कुटुंबातील शांताराम सोमाजी
कावळे ( 45), त्यांची पत्नी सीमा शांताराम कावळे (40), मुलगा अभिजित शांताराम कावळे (22), मुलगा सुजीत शांताराम कावळे (17) हे सर्व कुटुंबीय मागील काही वर्षांपासून रोजगारानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले होते; परंतु कोरोना संकटात लागलेल्या लॉकडाऊनमुळे
त्यांचा रोजगार गेल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी टेंभी येथे परतले. त्यांच्या वाट्याला टेंभी येथील एक एकर शेत आले आहे.

मागील आठ दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गावातून बेपत्ता होते; परंतु यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी एका वन कर्मचार्‍याला जंगलात आई व मुलाचा बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला तर जवळच वडिलांचा गळफास असलेला मृतदेह आढळून आला. या कर्मचार्‍याने तामसा पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर
दाखल झाला. सीमा आणि सुजीतचा दोरीने बांधून त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तर अभिजित हा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.

घटनास्थळावर अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, तामशाचे स.पो.नि.अशोक उजगरे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या हे खून वाटत असून त्यादिशेने पोलिस तपास करीत आहेत. कावळे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच गावात परतले होते. आई व मुलाचा खून झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या लक्षात येते. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल. यातील आरोपी लवकरच पकडले जातील, असे भोकरचे अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news