पुढारी ऑनलाईन डेस्क
कन्नड सिनेमाचे 'पॉवरस्टार' आणि लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी त्यांच्या 'गंधाडा गुडी' (Gandhada Gudi) माहितीपटाचा (documentary) टीजर रिलीज करण्यात आलाय. पुनीत यांच्या दिवंगत आई पर्वतम्मा राजकुमार यांच्या जयंती दिवशी टीजर रिलीज केला आहे. 'गंधाडा गुडी'ची निर्मिती पुनीत यांच्या पीआरके प्रोडक्शनने केली आहे. यात पुनीत आणि अमोघवर्षा यांच्या भूमिका आहेत. पुनीत यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्यांच्या documentary चा टीजर पाहून चाहते भावूक झाले आहेत. हा टीजर रिलीज होताच एका दिवसांत त्याला २७ लाखांहून अधिक views मिळाले आहेत.
हा चित्रपट कर्नाटकातील वन्यजीवांवर आधारीत एक माहितीपट असून पुढील वर्षी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पीआरके प्रोडक्शनने हा चित्रपट पुनीत यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. पीआरके प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचा टीजर रिलीज करत लिहिले आहे, "अप्पूचे स्वप्न, एक अविश्वसनीय प्रवास. परतीची वेळ आली आहे – 'गंधाडा गुडी"(Gandhada Gudi).
एक मिनिटाच्या टीजरमध्ये राज्याच्या जंगलातील प्रवास दाखविण्यात आला आहे. या माहितीपटाचे नाव पुनीत यांचे वडील प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते राजकुमार यांच्या १९७३ मधील सुपरहीट चित्रपट 'गंधाडा गुडी'वरून देण्यात आले आहे. पुनीत यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. पुनीत यांना अप्पू आणि पॉवरस्टार नावाने ओळखले जात होते.
१९८० मध्ये वडील राजकुमार यांच्यासोबत पुनीत (Puneeth Rajkumar) यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. वडिलांचा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला. १९८५ मध्ये प्रदर्शित 'बेट्टद हुवू' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. अप्पू, पॉवरसह अनेक चित्रपट गाजले.