लवंगी मिरची : ओ माय…. | पुढारी

लवंगी मिरची : ओ माय....

लवंगी मिरची :

तो : सखे, कशी आहेस?
ती : मी रागावले आहे तुझ्यावर.
तो : का?
ती : हे सखी वगैरे काय सुरू केलं आहेस?
तो : आवडलं नाही का तुला?
ती : तसे नाही, पण नेहमी तू जशी हाक मारतोस तशी आज मारली नाहीस.
तो : माझ्या नाही लक्षात आलं!
ती : साहित्य समंलेनाचा परिणाम दुसरं काय?
तो : संमेलनाचा आणि आपल्या प्रेमाचा काय संबंध?
ती : तुझं मराठी प्रेम एकदम उफाळून आलं आणि मला ओ माय डार्लिंग असं म्हणणारा तू आज चक्क सखी म्हणून हाक मारतोस!
तो : तो काही संमेलनाचा परिणाम नाही.
ती : मग कशाचा आहे?
तो : तो नवीन आलाय ना!
ती : कोण?
तो : ओमायक्रॉन!
ती : त्याचा आणि मला ओ माय डार्लिंग न म्हणण्याचा काय संबंध?
तो : नसायला काय झालं? सध्या ओमाय हा शब्द उच्चारायचीच भीती वाटायला लागली आहे.
ती : बराच आहेस की!
तो : सध्या तरी ओमायक्रॉन आठवत आणि तो आठवला की ओमाय गॉड आठवतो. मग अधले मधले हे ओमाय डार्लिंग वगैरे अजिबात आठवतच नाहीत.
ती : हे मात्र जास्तच झालं हं!
तो : हो जास्तीच झालंय हे खरंच आहे. प्रेयसी प्रियकराला वेगवेगळ्या रूपात भेटते असे म्हटले जाते. आता विषाणूसुद्धा वेगवेगळ्या रूपात भेटायला लागले आहेत.
ती : शी काय हे? विषाणू आणि प्रेयसी यांची तुलना करणारा तू जगातला सर्वात कृतघ्न प्रियकर असशील.
तो : असू दे!
ती : ओमाय डार्लिंगमधलं ‘ओमाय’ सोडून दे, ‘डार्लिंग’ तरी म्हणशील की नाही?
तो : गुड सजेशन!
ती : आता तो ओमायक्रोन आलाय. पुन्हा पहिल्यासारखे सगळे नियम पाळायचे आहेत. हलगर्जीपणा करायचा नाही. दोन गोष्टी करायच्या.एक म्हणजे सुरक्षित अंतर आणि दुसरी म्हणजे तोंडावर मास्क.
तो : दोन्हीही त्रासदायकच! आता मात्र ‘ओ माय गॉड’ म्हणण्याची वेळ आली आहे.

– झटका

लवंगी मिरची

Back to top button