जिल्ह्यातील चिखली शहरात मंगळवार १६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानात घुसून तीन अज्ञात दरोखोरांनी तलवारीने व्यापाऱ्याचा गळा कापला. ते दुकानातील रोकड घेऊन पसार झाले आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरोड्याच्या घटनेने चिखली शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण व खळबळ झाली आहे.
चिखली बसस्थानकाच्या समोर मुख्य मार्गावर आनंद इलेक्ट्रॉनिक्स हे मोठे दुकान आहे. दुकानदार कमलेश पोपट (वय ५५) हे दिवसभरातील व्यवसायाचा हिशोब करीत होते. यावेळी चेहरे झाकलेले तीन जण दुकानाजवळ येऊन थांबले. त्यातील दोघांनी ग्राहक असल्याचे भासवून दुकानात प्रवेश केला. दुकानाचे एक शटर आतून बंद केले आणि धमकावले.
यावेळी दुकानदार पोपट यांनी प्रतिकार केला असता त्यातील एकाने तलवार काढून सपासप वार केले. यात पोपट यांचा मृत्यू झाला. दुकानातील रोख रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले. हा घटनाक्रम सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. किती रक्कम लुटली गेली याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.
या घटनेनंतर चिखली शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण व खळबळ झाली. स्थानिक पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरोडेखोरांना शोधण्यासाठी तपासपथके कार्यरत झाली आहेत.