पराभवाचा बदला की विजयाची पुनरावृत्ती? सतेज पाटील, अमल महाडिक पुन्हा आमने-सामने | पुढारी

पराभवाचा बदला की विजयाची पुनरावृत्ती? सतेज पाटील, अमल महाडिक पुन्हा आमने-सामने

कोल्हापूर; सतीश सरीकर

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने अखेर महाडिक कुटुंबातील अमल यांनाच मैदानात उतरवले आहे. दोघेही तगडे उमेदवार पुन्हा आमने-सामने आल्याने काटाजोड लढत होऊन निवडणुकीची रंगत वाढणार आहे. काँग्रेस व भाजपकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिणामी, अमल महाडिक हे पराभवाचा बदला घेणार की सतेज पाटील विजयाची पुनरावृत्ती करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

2014 मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अमल महाडिक यांनी अवघ्या 22 दिवसांत प्रचार करून परावभावाची धूळ चारली होती. काही महिन्यांतच 2015 मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडील व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून उट्टे काढले होते. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहिली. 2019 मध्ये सतेज पाटील यांच्या पराभवाचा बदला त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी घेतला. नवख्या ऋतुराज यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने अमल महाडिक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा

पालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने महाडिक यांच्या ताब्यातील संस्था ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. सद्य:स्थितीत महाडिकांच्या ताब्यातील महत्त्वपूर्ण गोकुळवर पालकमंत्री पाटील यांनी वर्चस्व मिळवले आहे. सतेज पाटील व महाडिक कुटुंबीय यांच्यात प्रचंड ईर्ष्येचे आणि टोकाचे राजकारण सुरू आहे. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने 2014 मधील विजयाची पुनरावृत्ती करणार, की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे.

एकमेकांना राजकीयद़ृष्ट्या नामोहरम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळी रचली जात आहे. हाय होल्टेज लढत असल्याने प्रसंगी साम, दाम, दंड, भेद, नीती अवलंबिली जात असल्याची चर्चा आहे.

काही वर्षांपूर्वी सतेज पाटील व महाडिक एकत्रच होते. परंतु, राजकीय इच्छा-आकांक्षा रुंदावत गेल्या आणि त्यांच्यात फूट पडली. आता पाटील व महाडिक यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे. एकेकाळी जीवलग मित्र असलेले सतेज पाटील व धनंजय महाडिक पारंपरिक कट्टर विरोधक झाले आहेत. ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत ते पतसंस्थेपासून केडीसीपर्यंत त्यांच्यात चुरस आणि ईर्ष्या पाहायला मिळते. आरोप-प्रत्यारोप अत्यंत खालच्या पातळीपर्यंत होतात. या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे.

हेही वाचलत का?

मेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Back to top button