कोल्हापूर रेल्वे स्थानकातून पॅसेंजर ट्रेन दीड वर्षाने रूळावर; सर्व सेवा सुरळीत करण्याची मागणी | पुढारी

कोल्हापूर रेल्वे स्थानकातून पॅसेंजर ट्रेन दीड वर्षाने रूळावर; सर्व सेवा सुरळीत करण्याची मागणी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

तब्बल दीड वर्षानंतर पॅसेंजर ट्रेन मंगळवारी रुळावर आली. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून 18 महिन्यांनंतर सातार्‍यासाठी पॅसेेंजर डेमू धावली. पॅसेंजर ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. उर्वरित सर्व सेवा सुरळीत सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दि.23 मार्च 2020 पासून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या ‘स्पेशल ट्रेन’ म्हणून सुरू केल्या. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंदच होत्या. मंगळवारपासून पुणे विभागातील काही पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात आल्या.

कोल्हापूर रेल्वेस्थानकात सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचे आगमन झाले. यानंतर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी कोल्हापूर स्थानकातून सातार्‍यासाठी पॅसेंजर रवाना झाली. पहिल्या टप्प्यात एकच पॅसेंजर सुरू करण्यात आली आहे. दोन डोस घेतलेल्यांना त्याचे तिकीट दिले जाणार आहे. या पॅसेंजरसाठी एक्स्प्रेसच्या दराने भाडे आकारले जाणार असले, तरी पॅसेंजरचे सर्व थांबे देण्यात येणार आहेत. यामुळे दीड वर्षानंतर प्रथमच गांधीनगर, रुकडी, हातकणंगले, निमशिरगाव, जयसिंगपूर आदी स्थानकांवर रेल्वे थांबली.

दरम्यान, कोल्हापूर स्थानकात सायंकाळी स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, आयआरटीसीचे विजय कुंभार, आप्पासो कांबळे आदी उपस्थित होते.

विमानात बसल्याचा आनंद
आमचे हातावरचे पोट. व्यवसायानिमित्त दररोज कोल्हापूरला यावे लागते. रेल्वे नसल्याने एसटीचा प्रवास परवडत नव्हता. दररोजच्या खर्चाने अक्षरश: डोळ्यांतून पाणी येत होते. पॅसेंजर सुरू झाल्याने विमानात बसल्याचाच आनंद झाला.
फारूक सय्यद, मिरज

आनंद व्यक्त करायला शब्द नाहीत
पॅसेंजर बंद, काही दिवस एसटीही बंद होती. नोकरीसाठी येताना अनेकांना विनवण्या कराव्या लागत होत्या. हात जोडावे लागत होते. आता पॅसेंजर सुरू झाल्याने आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत. सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत कराव्यात.
मंदाकिनी पवार, मिरज

सर्व पॅसेंजर गाड्या नियमित सुरू करा
गेली 19 महिने जयसिंगपूर ते कोल्हापूर असा प्रवास करताना त्रासाला समाोरे जावे लागले. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. मात्र, आता पॅसेंजर सुरू झाल्याने प्रवासाची चिंता मिटली आहे. सर्व पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात.
शरद गावडे, जयसिंगपूर

नोकरदार, विद्यार्थी, व्यापार्‍यांची सोय झाली
कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजरला नोकरदार, विद्यार्थी, व्यापार्‍यांची मोठी गर्दी असते. पॅसेंजर बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पॅसेंजर सुरू झाल्याने नोकरदार, विद्यार्थी, व्यापार्‍यांची सोय झाली.
आनंद बर्वे, सांगली

Back to top button