कोल्हापूर : राजाराम कारखाना कसबा बावड्यासह १२२ गावांमधील सभासदांचाच : अमल महाडिक

Amal Mahadik
Amal Mahadik

कसबा बावडा (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना विस्तारीकरणास मदत करा. हा कारखाना कसबा बावड्यासह सात तालुक्यांतील १२२ गावांमधील सभासदांचाच, असा टोला कारखान्याचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला. कारखान्याच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील होते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सभेस प्रमुख उपस्थिती होती.

सभेत बोलताना अमल महाडिक पुढे म्हणाले, सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत (एम एस पी) ३५०० रुपये करावी. साखर निर्यातीचे धोरण लवकरात लवकर निश्चित करावे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत त्यांची बिले अदा करता येतील. कारखान्याच्या वार्षिक सभेतील ठरावाची प्रत राज्य सरकारला पाठवून केंद्राकडे मागणी करण्याची विनंती करू. कार्यक्षेत्रात ८००-९०० गुऱ्हाळघरे होती. यातील बरीच गुऱ्हाळे घरे बंद झाली. यामुळे कारखान्याकडील उसाच्या नोंदी वाढल्या आहेत. येणाऱ्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे विक्रमी ८६०० हेक्टर उसाची नोंद झाली असून कारखान्याचे उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी १२९ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी सभेत दिली.

शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघावे लागेल. जे सभासद, शेतकरी ऊस क्षेत्रामध्ये नवीन मशनरी, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतील अशा सभासद शेतकरी यांना कारखाना व्यवस्थापन सदैव सहकार्य करेल. कारखाना कार्यक्षेत्रातील पाणंदीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी किसान सन्मान योजनेतून निधी मिळावा, यासाठी ही कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आश्वासन महाडिक यांनी सभेत दिले.

सभा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे विरोधक मोठ्या संख्येने सभागृहात सभास्थळी दाखल झाले. दरम्यान सभागृह पूर्ण भरले होते. आम्ही प्रश्न उपस्थित करणारे आहोत. आम्हाला बाजूच्या रस्त्याने पुढे जाऊ द्या, अशी विनंती विरोधकांनी अतिरिक्त पोलीस प्रमुख यांना केली. यावेळी विरोधक आणि पोलीस यांच्यातही वादावादी झाली. दरम्यान सभेची वेळ जवळ आल्याने संचालक मंडळ बाजूच्या रस्त्याने व्यासपीठाकडे जात असताना घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली.

सभासदांना गोड भेट

येणाऱ्या गळीत हंगामापासून प्रत्येक सभासदाला प्रत्येक महिन्याला एक किलो ज्यादा साखर तर दिपावलीसाठी तीन किलो ज्यादा साखर देणार असल्याची घोषणा संचालक अमल महाडिक यांनी सभेत करत सभासदांना गोड भेट दिली. त्याला समर्थक आणि टाळ्यांच्या गजरात साथ दिली.

पुढच्या वर्षीही सभा आम्हीच घेणार

पुढच्या वर्षीही आम्हीच सभा घेणार, असे स्पष्ट करुन माजी आमदार महादेव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांची कारखान्यातील ही शेवटची वार्षिक सभा आहे या इशाला नाव न घेता उत्तर दिले.

सभेच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त

गेले काही दिवस राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. यातूनच शुक्रवारी होणारी वार्षिक सभा वादळी होईल, याचा पूर्व अंदाज आल्याने पोलिसांनी सभास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॅरिकेट्स लावून कंपार्टमेंट करण्यात आली होती. यामध्ये जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे आणि शूटिंगही सुरू होते.

सभास्थळी विरोधक आणि सत्ताधारी समर्थक यांची जोरदार घोषणाबाजी

राजाराम कारखान्याची वार्षिक सभा सुरू होण्यापुर्वीच समर्थक सत्ताधारी समर्थकांनी सभास्थळ व्यापले होते. कोपऱ्यामध्ये आणि पाठीमागे विरोधकांना सभास्थळी जाण्याची संधी मिळाली. सभेच्या प्रवेशद्वाराजवळ गटाने आलेले विरोधक आणि सत्ताधारी समर्थक यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गुणवत्ता, प्रमाण आणि वचनबद्धता

गुणवत्ता, प्रमाण आणि वचनबद्धता (क्वालिटी, क्वांटिटी आणि कमिटमेंट) या त्रिसूत्रीवर यापुढे कारखान्याचे कामकाज चालेल, असे महाडिक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.

विरोधकांच्या बोगसच्या घोषणा

सभास्थळी अहवाल वाचनानंतर कार्यकारी संचालक सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. यावेळी सभागृहात गदारोळ सुरू होता. विरोधकांनी प्रश्नांची नीट उत्तरे ऐकू येत नसल्यामुळे बोगस बोगस अशा घोषणा दिल्या.

सभा संपली तरीही सनई चौघडा सुरुच

कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपली तरीही सभा मंडपात विरोधक माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी एका संचालकाने सभागृहात मोठ्याने सनई चौघडा वाजवण्याचे आदेश ऑपरेटरला दिले. यानंतर विरोधकांनी सभागृह सोडले.

सभेच्या प्रारंभी कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी केले. सभा शांततेत पार पाडावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सभास्थळी सत्ताधारी समर्थक पुढे तर काही विरोधक बाजूला तर उर्वरित विरोधक जागे अभावी अंतरावर बसले होते. विषयपत्रिकेवरील विषय वाचनास कार्यकारी प्रकाश चिटणीस यांनी सुरुवात केली.

समर्थकांनी सर्व विषयांना काही वेळातच मंजुरी दिली. यानंतर सभासदांनी दिलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. यावेळी समर्थक आणि विरोधक यांच्या घोषणा सुरुच होत्या.

सभेस उपाध्यक्ष वसंत बेनाडे, संचालक प्रशांत तेलवेकर, दिलीप उलपे, कुंडलिक चरापले, हरिश चौगले, सौ. कल्पना पाटील, माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम, सुधाकर साळोखे, सचिव उदय मोरे यांच्यासह सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news