गोव्यात 13 कोटींचे ड्रग्ज आणण्याचा कट उधळला | पुढारी

गोव्यात 13 कोटींचे ड्रग्ज आणण्याचा कट उधळला

पणजी/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा :  तेरा कोटींच्या ब्लॅक कोकेन या अमली पदार्थासह गोव्याकडे जाणार्‍या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियन देशातील महिलेला मुंबई विमानतळावर पकडले. तिच्याकडे 3 किलो 200 गॅ्रम ब्लॅक कोकेन सापडलेे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या मुंबई शाखेने ही कारवाई केली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे गोव्यात अमली पदार्थांचा व्यवसाय करणार्‍या एका नायजेरीयन नागरिकाला एका हॉटेलमधून गोवा एएनसीने अटक केली.

ब्राझीलहून आलेली ही बोलिव्हियाची नोवा मारिया नावाची 35 वर्षीय महिला मुंबई विमानतळावर उतरली होती. ती गोव्याला जाण्याच्या प्रयत्नात असताना विमानतळावरील एनसीबीच्या अधिकार्‍यांना संशय आल्यामुळे तिच्या साहित्याची झडती घेतली. तिच्याकडे सुमारे 13 कोटी रुपयांचे 3.20 किलोग्रॅम वजनाचे उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन सापडले. मारिया हिने हा ड्रग्ज आपल्या सुटकेसमध्ये लपवला होता. सुटकेसमध्ये 12 पाकिटांच्या स्वरूपात तो घट्ट बांधलेल्या स्थितीत होता.

ब्लॅक कोकेन हा कोकेनचा प्रकार आहे, जो इतर पदार्थांमध्ये मिसळून त्याचा रंग काळा केला जातो. त्यामुळे त्याची तस्करी मेटल मोल्डस किंवा डांबर म्हणून केली जाते. हा अमली पदार्थ स्निफर कुत्र्यांकडूनदेखील ओळखता येत नाही. या संदर्भात मुंबई विमानतळावर एनसीबीचे पथक तीन दिवस कारवाई करण्यास सिद्ध होते. ही बोलिव्हियन महिला ब्राझील ते गोवा असा प्रवास व्हाया इथिओपिया व मुंबईमार्गे करत होती. मुंबईहून गोव्यासाठी विमानात बसतानाच तिला ताब्यात घेण्यात आले, असे मुंबई एनसीबीच्या अधिकार्‍याने सांगितले. या झडतीवेळी तिच्याकडून दारू जप्त केली गेली. पुढील चौकशीत तिने गोव्यातील व्यक्तीला हे पार्सल पोहोच करायचे होते, अशी कबुली दिली. दरम्यान, गोव्यातून हैदराबादलाही अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी यापूर्वीही केला आहे. या प्रकरणामुळे त्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे . या कारवाईमुळे अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे.

गोव्यातूनही एकाला हॉटेलमधून उचलले

मुंबईत पकडलेल्या बोलिव्हियाच्या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई एनसीबीने गोवा एनसीबीला एका पुरुषाबाबत कळवल्यानंतर एनसीबीच्या गोवा शाखेने त्वरित हालचाल करून एका नायजेरीयनला एका हॉटेलातून अटक केली. त्याचे नाव जाहीर केलेले नाही. त्यानेही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा सदस्य असल्याची कबुली दिली. तो ड्रग्ज ट्रॅफिकर आहे.

मोरजीत रशियनला अटक

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी)ने मॅक्सिम मकारोव (वय 38) या रशियन नागरिकाला 900 ग्रॅम नॉन ऑईल या अमली पदार्थासह मोरजी येथे अटक केली. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत नऊ लाख रुपये भरते.

ब्लॅक कोकेन म्हणजे काय?

ब्लॅक कोकेन हे मूळ कोकेनच आहे. त्यात विविध पदार्थ मिसळून त्याचा रंग काळा केला जातो तेव्हा त्याला ब्लॅक कोकेन असे म्हणतात. विशेषत: त्यात हायड्रोक्लोराईड मिसळला जातो. जेणेकरून तो तपास यंत्रणांना सापडण्याची शक्यता कमी असते. वास (हुंगून) पदार्थ ओळखणार्‍या प्रशिक्षित कुत्र्यांनाही अनेकवेळा हा ब्लॅक कोकेन शोधण्यात अपयश येते. देशात पहिल्यांदाच हे ब्लॅक कोकेन पकडण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत उघड झाले आहे.

Back to top button