नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंगाला झोंबणारे थंड वारे, पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाचा जयघोष, आसमंतात घुमणारा नाशिक ढोलचा निनाद आणि क्षणाक्षणाला वाढणार उत्साह. अशा उस्फूर्त वातावरणात शुक्रवारी (दि.३) ९४ व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन'ची ग्रंथदिंडी निघाली. नाशिककरांनी दिंडी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या आणि फुलांची उधळण करत दिंडीचे जल्लोषात स्वागत केले.
टिळकवाडीतील कविवर्य कुसूमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळी ९.१५ ला कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री तथा संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, गजानन शेलार, साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिसआयुक्त दीपक पांडेय, संमेलन स्वागत समितीचे विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आदी दिंडीत सहभागी झाले.
शहरातील विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी दिंडीत हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रूक्मिणी व इतर साधु-महंतांच्या वेशभूषांनी उपस्थितांच्या नजरा वेधून घेतल्या. करंजगाव (ता. निफाड) येथील संस्कार निकेतनच्या मुलांनी विविध मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कविवर्य कुसूमाग्रज यांच्या निवासस्थानापासून निघालेली दिंडी टिळकवाडी सिग्नल, जुने सीबीएस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार व तेथून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे काहीकाळ विश्रांती घेतली. त्यानंतर वाहनांमधून पालखी आडगाव येथील कुसूमाग्रज नगरीकडे रवाना झाली.
ग्रंथदिंडी शहरातील विविध शाळा व संस्थाचे चित्ररथ सहभागी झाले. त्यामध्ये इस्पिलियर स्कुलच्या विज्ञान रथ, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची माहिती असलेला रथ, संस्कार निकेतन, इस्कॉन संस्थेच्या सांदीपान मुनि गुरूकुल यांचा समावेश होता. भगूर येथील शिक्षण मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानतील जीवनावर आधारित जीवंत देखावा उपस्थितांची दाद मिळवून गेला.