गोवा : ‘त्या’ मंत्र्याचे नाव न घेतल्याने भाजपसमोर पेच | पुढारी

गोवा : ‘त्या’ मंत्र्याचे नाव न घेतल्याने भाजपसमोर पेच

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका मंत्र्याने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई करण्यास भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मोकळीक दिली आहे. चोडणकर यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव घेतलेले नाही. त्याविषयी आरोप करणार्‍यापैकी कोणीच मंत्र्याचे नाव न घेतल्याने स्वतःहून अमूक एका मंत्र्यावर कारवाई कशी करायची हा मुख्यमंत्र्यांसमोर उभा ठाकलेला मोठा प्रश्न आहे.

भाजपच्या गाभा समितीत याविषयी मोठी चर्चा झाली. या प्रकरणाचे परिणाम भाजपला निवडणुकीच्या तोंडावर भोगावे लागतील, असा इशारा या समितीतील पक्ष धुरिणांनी दिला आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर हा विषय गांभीर्याने घेतला गेला आहे. दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने तेथूनही याबाबत विचारणा केली जात आहे. असे असले तरी तो नेमका मंत्री कोण हे कोणीच स्पष्ट न केल्याने कोणत्या मंत्र्यावर कारवाई करावी हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, चोडणकर यांनी पुराव्यासह नाव घेऊन आरोप करायला हवा होता. आता 12 मंत्र्यांविषयी संशयाचे वातावरण त्यांच्या आरोपानंतर तयार झाले आहे. दिल्लीत हात उंचावण्याच्या फोटोसेशनपासून चोडणकर यांना दूर राहावे लागत असल्याने त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा सनसनाटी आरोप केला की काय, अशी शंका येते. खरोखरच असे काही घडले असेल तर मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. मात्र पुराव्याअभावी केलेल्या आरोपामुळे कारवाई कोणावर हा प्रश्न उपस्थित होतो. समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगू लागली आहे. काहीजण अमूक एक मंत्री या प्रकरणात असावा असे गृहित धरून सुचकपणे लिहू लागले आहेत.

Back to top button