सोलापूर : अन् विमान जागेवरच कोसळलं… | पुढारी

सोलापूर : अन् विमान जागेवरच कोसळलं...

संतोष आचलारे ; सोलापूर

सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संक्रांतीपूर्वीच होम मैदानात गड्डा भरला. गड्डा यात्रेची रिबिन कापल्यानंतर साहजिकच मान्यवरांच्या मांदियाळीचा धुरळा गड्डा मैदानावर निघाला.

सालाबादप्रमाणे यंदाही पंच असलेल्या राजूअण्णा मालकांनी आपला मोर्चा कृषी प्रदर्शनाच्या दिशेने वळविला. प्रदर्शनात आत गेल्या गेल्या अण्णांच्या नजरेला औषध फवारणी करणारे विमान पडले. क्षणाचाही विलंब न लावता राजूअण्णांनी विमान हाती घेत आकाशात भिरकावून दिले.

राजूअण्णांनी आकाशात विमान भिरकावून दिल्याचे चित्र जवळच थांबलेल्या डॉक्टर संदी काकांना चांगलंच खुपलं. इतक्यात प्रदर्शनात आलेल्या रंगीबेरंगी चिमण्यांवर डॉक्टर संदी अण्णाचं लक्ष गेलं. त्यांनी क्षणाचाही विचार न करता एक चिमणी हातात पटकन घेतली अन् आकाशात सोडून राजूअण्णांच्या चेहर्‍याकडे एकटक पाहातच राहिले.

‘सबका साथ, सबका विकास’, असा मंत्र म्हणत जवळच बसलेल्या डॉक्टर महास्वामींनी राजूअण्णा व डॉक्टर संदी काकांच्या उचापती पाहिल्या अन् नाकाला लावलेला मास्क तोंडावर लावून मौन व्रत धारण केलं. रिबिन कापून कृषी प्रदर्शनाला न जाताच दक्षिण भागातील आमदार बापूंनी पटकन गड्डा यात्रेतील भातुकलीमधील राजा अन् राणीची जोडी हाती घेतली अन् भातुकलीच्या खेळामधल्या राजा अन् राणीचं लग्न विमानतळालगत असलेल्या मंगल कार्यालयात लावण्यात रममाण झाले. बापू लग्नघाईत दंग असल्याचं पाहून याच भागातील दिलीप मालकांनी गड्डा मैदानातून हळूच कलटी मारली अन् त्यांच्या मागंमागं हळूच केतनभाईनींही आपलं दुकान गाठणं पसंत केलं.

रिबिन कापायचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच इंद्रधनुमधील कारभार्‍याच्या खांद्यावर चिमणी आल्यानं त्यांन तिथेचं काही काळ शिवतांडव केला. इंद्रधनुच्या राजवाड्यातील पाटलांनी डोळे वटारल्यानंतरच शिवतांडव शांत झालं. शिवतांडवाच नृत्य पाहण्यात मग्न असलेल्या जवळच महसूल कचेरीमधील ‘शंभरी’कर अण्णांनी समाधान मानलं.

गड्डा यात्रेतील अत्यंत महत्त्वाच्या ‘तुकाराम’ रस्त्यावरच उसाच रस विकणार्‍या एका फाटक्या कुटुंबावर ‘योगीन गुजरां’ची अन् इंजिनिअर मिलिंद साहेबांची नजर पडली. लागलीच त्यांनी याबाबत लॉऊडस्पीकर लावून आरडाओरड सुरू केली. दोघांची लईच किरकिरी वाढल्यानं अखेर इंद्रधनुमधील कारभार्‍यांनी त्या ‘तुकाराम महाराज’ रस्त्यावरील उसाचा गाडा पालथा घातला. उसाचा रस विकून आपल्या चिऊताईला चिमणी अन् पिंट्याला विमान घेण्याचा बेत असलेल्या रसवाल्याचं स्वप्न मात्र क्षणात भंगलं. गड्डा भरला, पण चिमणी उडाली अन् विमानपण कोसळलं असंच पुटपुटणं यानिमित्तानं भक्तांच्या तोंडातून बाहेर पडलं.

Back to top button