फॉरेन्सिक अहवालात बुलढाणा बस अपघाताचे उलगडले सत्य | पुढारी

फॉरेन्सिक अहवालात बुलढाणा बस अपघाताचे उलगडले सत्य

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातानंतर (Buldhana Bus Accident) लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत मुंबईच्या फॉरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास केला. या तपासाचा अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण समोर आले आहे.

अपघात (Buldhana Bus Accident) झाला तेव्हा बसमध्ये ३५० लिटर डिझेल होते. कारंजा येथून जेवण करून 11.30 ला समृद्धीमार्गे पुढे निघाल्यानंतर हा अपघात रात्री १.३२ वाजताच्या सुमारास बहुतांशी प्रवासी झोपेत असताना झाला. अपघात झाला तेव्हा 70-80 किलोमीटर प्रति तास वेगात ही बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये चालत होती. या बसचे समोरचे चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डला धडकले त्यानंतर समोरचे चाक दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी काँक्रिटच्या दुभाजकाला धडकले याच दुभाजकाला बसचे पाठीमागचे चाकही धडकले आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. मागील चाक आरसीसी काँक्रिट दुभाजकाला धडकल्याने मागील टायर फुटला.

दरम्यान, समोरच्या आणि मागच्या चाकाची दुभाजकाला धडक झाल्यानंतर ही बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचे प्रवेशद्वार खाली गेले. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली. यावेळी बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल डिझेल टँकवर आदळल्याने टाकीतील डिझेल सर्वत्र उडाले. त्याचा हॉट एक्झॉस्टशी संपर्कातून भडका उडाला, असे या अहवालात म्हटले आहे. शेवटी चूक कुणाची, चालकाची, त्या निष्पाप प्रवाशांची की समृद्धी महामार्गाची ? की वारंवार अपघात घडूनही गंभीर नसलेल्या शासन, प्रशासनाची ? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button