अमरावती : दर्यापूर-अंजनगाव मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी | पुढारी

अमरावती : दर्यापूर-अंजनगाव मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावती, पुढारी वृत्तसेवा : दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहगाव फाटा जवळ सोमवारी (२२ मे) रात्री अकराच्या सुमारास एका बाराचाकी वाहनाने टाटा एसला मागून जबर धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. यातील सात जण गंभीर जखमी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये २ लहान मुले, २ महिला व एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

टाटानगर बाबळी येथील एकाच कुटुंबातील हे सर्व १२ जण अंजनगाव येथे लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर दर्यापूरकडे येत असताना लेहगाव जवळ अंजनगाव मार्गावरून पाठीमागून भरधाव वेगाने बाराचाकी वाहनाने या टाटा एस ला जोरात धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील बाराही जण रस्त्यावर पडले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा दर्यापूर येथे रुग्णालयात नेताना व दोघांचा अमरावती येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातामध्ये आणखी सात जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर घटनेची माहिती नंदू पाटील अरबट, अतुल सगणे आदी कार्यकर्त्यांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील सात जण गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. खल्लार पोलिसांनी चार चाकी वाहन ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

Back to top button