

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : तब्बल ४१ वर्षांनी मुंबईच्या वेश्यालयातील धगधगते वास्तव पुन्हा उघडकीस आले. १९८२ मध्ये नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. वर्षभरात सुमारे २ हजार लोकांनी तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले होते. अखेर तिचा मृत्यू झाला. सोमवारी असेच एक भयंकर प्रकरण उघडकीस आले. गुजरातमधील तब्बल १५ अल्पवयीन मुलींना महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यांच्या वयापेक्षा दुप्पट, तिप्पट वयाने मोठ्या असलेल्या अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा बळजबरी करण्यात आली.
एका टोळीने १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट वयाने मोठ्या असलेल्या अनेक लोकांना नवरीच्या स्वरुपात विकले. अशोक पटेल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याने सुमारे १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये विक्री केल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कनबा गावातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तपासातून या टोळीचा शोध लागला. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली.
तुळसाची पुनरावृत्ती ही मुंबईत गाजलेल्या तुळसाच्या कहाणीची पुनरावृत्ती होय. १९८२ मध्ये १३ वर्षीय तुळसा भिरदुज थापा नावाच्या मुलीचे नेपाळमधून अपहरण करण्यात आले. तिला मुंबईच्या वेश्यालयात विकण्यात आले. एका वर्षात तिला मुंबईतील तीन वेश्यालयांत विकण्यात आले होते. या दरम्यान सुमारे २ हजार लोकांनी तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. त्यामुळे तिला अनेक आजार जडले. यातच तिचा मृत्यू झाला.
तुळसाला जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी जेजे हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. ईश्वर गिलाडा यांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर तत्कालिन पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईतील अनेक वेश्यालयांवर धाडी टाकल्या. वेश्यालय चालवणाऱ्या महिला, मुलींची विक्री करणारे दलाल, शासकीय अधिकारी, पोलीस दलातील काही व्यक्ती आदी लोकांच्या छुप्या नेटवर्कला उद्ध्वस्त केले. त्यानंतर तुळसाला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या ३२ आरोपींवर खटला चालला. तेव्हा पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी आरोपींना शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तुलासाच्या वडिलांना आणि मामाला मुंबईत आणून साक्षी नोंदवल्या. परंतु, तुळसाला न्याय मिळाला नाही. न्यायालयाने पोलीस आणि सरकारी वकील यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. या प्रकरणातील अपयशाला तेच कारणीभूत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तामिळनाडूची मुलगी
डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले, कोणत्याही अल्पवयीन मुलीसोबत अशा घटना घडू शकतात. मुंबईच्या एका वेश्यालयात तामिळनाडूतील एका मुलीला विकण्यात आले होते. ती दररोज एक संदेश लिहून एका दगडाला बांधून वेश्यालयाबाहेर फेकायची. त्यानंतर एका व्यक्तीने तो संदेश वाचला. तिच्या आईवडिलांना याची माहिती दिली. तिचे वडील तामिळनाडू पोलीस दलात अधिकारी होते. त्यानंतर मुंबईतील वेश्यालयात धाडी टाकण्यात आल्या. यावरून दिसून येते की, कोणत्याही मुलीसोबत अशा घटना घडू शकतात. गुजरातमध्येही अशा घटना घडत असतील तर इतर राज्यांचा विचार न केलेलाच बरा.
अल्पवयीन मुलींवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. ही प्रकरणे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावीत. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात सुधारणा करण्यात आली. परंतु, अजूनही अशी माणुसकीला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत, याकडे डॉ. गिलाडा यांनी लक्ष वेधले.
मुंबईतील वेश्यालये अनेक आजारांचे महाद्वार असल्याचे दिसून येते. तुळसा सुमारे वर्षभर मुंबईच्या वेगवेगळ्या वेश्यालयात होती. सुमारे २ हजार लोकांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. या दरम्यान तिला अनेक दुर्धर आजारांनी वेढले. अनेक संसर्गजन्य रोगांची लागण झाली. तिला प्रथम एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिला जेजे रुग्णालयात दाखल केले. येथे तिची प्रकृती सुधारली. परंतु, अखेर क्षयरोगाने तिचा मृत्यू झाला.