सांगली : मारहाणीत मुलाचा मृत्यू; मांत्रिकावर गुन्हा दाखल

नागज; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील मांत्रिकाने जबर मारहाण केल्याने इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील आर्यन दीपक लांडगे (वय 14) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आप्पासाहेब कांबळे (रा. शिरगुर, ता. रायबाग, जि. बेळगाव) या मांत्रिकाविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कवठेमहांकाळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारूक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी सोमवारी दिवसभर इरळी येथे आर्यनच्या कुटुंबाशी संपर्क करून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यांना आधार देऊन मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. तसेच कवठेमहांकाळ पोलिसांची भेट देऊन संबंधित मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार मांत्रिक कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत आर्यनची आई कविता लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आर्यन हा काही दिवसांपासून आजारी होता. त्याचे पाय, घोटा, गुडघे, हाताचे सांधे दुखत होते. दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने कविता लांडगे या आपल्या दोन्ही मुलाला घेऊन बहिणीकडे एरंडोली (ता. मिरज) ला गेल्या होत्या. तेथे गेल्यावर आर्यनला धाप लागल्यासारखे होऊ लागल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला सुभाषनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करूनही त्याचा आजार कमी झाला नाही. तेथून त्या आर्यनला घेऊन शिवनूर (ता. अथणी) या गावी त्यांच्या माहेरी गेल्या. तेथे गेल्यावर शंभरगी येथील खासगी दवाखान्यात दाखवूनही आर्यनला फरक पडला नाही. आर्यनच्या मामी शेवंता कांबळे यांनी माझे वडील आप्पासाहेब कांबळे (रा. शिरगुर ता. रायबाग) हे बाहेरवास बघतात, असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी (दि.18) आर्यनला त्याचे मामा व मामी यांनी शिरगुरला नेले. तेथे नेल्यावर संशयित आप्पासाहेब कांबळे याने आर्यनवर कुणीतरी करणी केली असल्याचे सांगितले. बंद खोलीत नेऊन गोल रिंगण करून त्यात त्याला उभे केले. त्याच्या मांडीवर, गालावर, पाठीवर काठीने बेदम मारहाण केली. रक्त साखळल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला अथणी येथील दवाखान्यात नेले. गंभीर मार लागल्याने त्याला पुन्हा मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
20 मेचा योगायोग : चार वर्षांपूर्वी वडिलांचे निधन
आर्यन याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी 20 मे रोजी निधन झाले आहे. आर्यनही 20 मे रोजीच अंधश्रद्धेचा बळी गेला. घरात सध्या आजी-आजोबा, आई व बहीण असा परिवार आहे. मोलमजुरी करून जगणार्या कुटुंबातील आर्यन हा एकुलता एक मुलगा होता. आर्यनचा घात झाल्याने आजी-आजोबा व आईच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे.