पिंपरी : मृत्यूचा बनावट दाखला दिल्याने पालिका कर्मचार्‍यावर कारवाई | पुढारी

पिंपरी : मृत्यूचा बनावट दाखला दिल्याने पालिका कर्मचार्‍यावर कारवाई

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या संत तुकारामनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शिपाई असलेला नीलेश राठोड याने हिरालाल परदेश या व्यक्तीच्या नावाने मृत्यूचा खोटा दाखला तयार करून दिला. त्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले होते. ती कारवाई शिथिल करीत वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

राठोड हा वायसीएम रुग्णालयात शिपाई म्हणून काम करीत होता. ओळखीचा आणि पदाचा गैरफायदा घेऊन त्याने बनावट मृत्यू दाखला बनवून दिला. या प्रकारामुळे पालिकेची फसवणूक झाली. तसेच, ऑगस्ट 2016 ते जुलै 2018 या कालावधीत तो 275 दिवस विनापरवाना गैरहजर असल्याने रुग्णालय सेवेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे राठोड याचे सेवानिलंबन करून विभागीय चौकशी करण्याची कारवाई करण्यात आली.

विभागीय चौकशीत राठोड याच्यावरील सर्व दोषारोप सिद्ध झाले आहेत. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले. उद्यान विभागात काम करताना राठोड याच्या वर्तनात सुधारणा झाल्याची शिफारस त्या विभागाने आयुक्तांकडे केली आहे.त्यामुळे 2 वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम करून कायमस्वरूपी रोखून ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

Back to top button