लोकसभेत गदारोळातच कॉम्पिटिशन सुधारणा विधेयक मंजूर; गदारोळामुळे उभय सदनांचे कामकाज वाया | पुढारी

लोकसभेत गदारोळातच कॉम्पिटिशन सुधारणा विधेयक मंजूर; गदारोळामुळे उभय सदनांचे कामकाज वाया

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी घातलेल्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या उभय सदनात आज कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेत गदारोळातच कॉम्पिटिशन सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. दुसरीकडे सरकारकडून जैवविविधता सुधारणा विधेयक आणि वन संवर्धन सुधारणा ही विधेयके मांडण्यात आली. यातील वन संवर्धन सुधारणा विधेयक अधिक विचारासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले आहे.

आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या कामकाज नियमनासंदर्भात कॉम्पिटिशन सुधारणा विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयकातील ठळक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळामुळे कोणालाही काही ऐकू येत नव्हते. अखेर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. दुसरीकडे वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन संवर्धन सुधारणा विधेयक मांडले.

अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती [जेपीसी] स्थापन करावी, या मागणीवरुन काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी तर राहुल गांधी यांनी माफी मागावी, असा आग्रह करीत सत्ताधारी भाजपने आजही संसदेत गोंधळ घातला. गदारोळामुळे दोन्ही सदनाचे बहुतांश कामकाज वाया गेले. सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने संसदेचे कामकाज ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button