सावरकर वादावर शरद पवारांची मध्यस्थी फळाला! राहुल गांधी म्हणाले, "आम्ही आघाडीतील..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानांमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे महाविकास आघाडीतही तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. आता हा तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. महाविकास आघाडीची एकजूट ठेवण्यासाठी शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीला यश आल्याचे दिसत आहे. कारण शरद पवारांबरोबरील चर्चेनंतर महाविकास आघाडीबाबत राहुल गांधींनी महत्त्वाचे विधान केले आहे. ( Sharad Pawar and Rahul Gandhi )
” माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. यावर तीव्र आक्षेप घेत जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या टिप्पणीवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे मविआतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीतून उद्धव ठाकरे गटाने सभात्याग करत आपली नाराजी दाखवून दिली होती.
विरोधी पक्षांची लढाई भाजपविरोधात : Sharad Pawar and Rahul Gandhi
काँग्रेस आणि ठाकरे गटामधील मतभेदांवर शरद पवारांनी मध्यस्थी केली होती. विरोधी पक्षांच्या बैठकीवेळी सावरकर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते, असेही पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते. विरोधी पक्षांची खरी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी आहे, असा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता.
काय म्हणाले राहुल गांधी ?
सावरकर वादावर शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर राहुल गांधी यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. आघाडीतील पक्षांच्या नेत्यांच्या भावनांचा आदर करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे आता ठाकरे गट आणि काँग्रेसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्यावर असणार्या मतभेदांवर पडदा पडल्याचे मानले जात आहे.
संजय राऊत यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट
दरम्यान आज ( दि. २९) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. याची माहिती त्यांनी ट्विटवरुन दिली. त्यांनी म्हटले आहे की, आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सारे काही आलबेल आहे. चिंता नसावी.
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
हेही वाचा :
- Land For Job Scam : ‘लॅंड फाॅर जाॅब’ घोटाळा प्रकरणाची सुनावणी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलली
- UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा
- Karnataka assembly election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, १० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल