Karnataka assembly election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, १० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Karnataka assembly election 2023) तारखांची घोषणा केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होईल. तर १३ मे रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
निवडणुकीची अधिसूचना १३ एप्रिल रोजी जारी होईल. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल असेल. अर्जांची छाननी २१ एप्रिल रोजी तर अर्ज मागे घेण्याची तारीख २४ एप्रिल असेल. या निवडणुकीसाठी मतदान १० मे रोजी होणार असून निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
Karnataka Assembly elections will be held on 10th May; counting of votes on 13th May pic.twitter.com/SYcfTnFnDB
— ANI (@ANI) March 29, 2023
कर्नाटकात २०१८-१९ मध्ये प्रथमच मतदारांची संख्या ९.१७ लाखांनी वाढली आहे. १ एप्रिलपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. कर्नाटकातील २२४ विधानसभा मतदारसंघात ५,२१,७३,५७९ नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात ५८,२८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
मुक्त, निष्पक्ष आणि प्रलोभनमुक्त निवडणुका घेण्यासाठी नागरिकांची जागरूकता आणि सहकार्य महत्त्वाचे आहे. ECI च्या cVigil App द्वारे नागरिक कोणत्याही प्रकारच्या निवडणूक गैरप्रकारांची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकतात. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांत प्रतिसाद दिला जाईल, असेही ते म्हणाले.
निवडणुकीत मनी पॉवरचा वापर रोखण्यासाठी आमची कर्नाटकात मजबूत टीम असेल. २,४०० स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम यावर कडक नजर ठेवेल. १९ जिल्ह्यांतील १७१ आंतरराज्य चेक पोस्ट्सवर देखरेख राहील, असेही त्यांनी नमूद केले.
विधानसभेच्या २२४ जागा असलेल्या कर्नाटकामध्ये सध्या सत्ताधारी भाजपचे ११९ आमदार आहेत, तर काँग्रेसकडे ७५ आणि त्याचा मित्रपक्ष JD(S) कडे २८ आमदारांचे संख्याबळ आहे.
विधानसभा निवडणूक (Karnataka assembly election 2023) तोंडावर असताना भाजप, काँग्रेस आणि जेडी(एस) या राजकीय पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.
बोम्मई यांचा कन्नडिगांच्या मुद्द्यावर तसेच मुस्लिम समाजासाठी धर्मावर आधारित आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वक्कलिंग समुदायांना आरक्षण देण्यावर भर आहे. याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती-जमाती आणि पंचमसाली लिंगायत समाजाचीही अनेक वर्षांपासूनची आरक्षणाची मागणी पूर्ण केली आहे. या समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. २ बी अंतर्गत मुस्लिमांना दिलेले आरक्षण रद्द करून त्यांना आर्थिकद़ृष्ट्या मागास वर्गात आरक्षण दिले जाईल. पंचमसाली लिंगायत आणि वक्कलिग समुदायाने २ सी श्रेणी अंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे. ती पूर्ण करण्यासाठी २ सी अंतर्गत वक्कलिगांना ६ टक्के आणि २ डी अंतर्गत लिंगायतांना ७ टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले आहे.
कर्नाटक हे भाजपसाठी “दक्षिणेचे प्रवेशद्वार”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचा अनेकवेळा दौरा केला आहे. त्यांनी अनेकवेळा कर्नाटक हे भाजपचे “दक्षिणेचे प्रवेशद्वार” असल्याचा उल्लेख केला आहे. शाह यांनी नुकतीच सोमवारी बंगळूर येथे राज्य भाजप कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक घेतली होती. याआधी अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे कौतुक करत दोघांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले प्रशासन दिल्याचे म्हटले होते. (Karnataka assembly election 2023)
काँग्रेसकडूनही जोरदार तयारी
काँग्रेसने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. ही निवडणूक विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य व देशासाठी असेल, असे कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला आहे.
२०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या आशा आहेत, यासाठी पक्ष जोरदार तयारी करत आहे. काँग्रेस निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, याच अनुषंगाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्यात मोठ्या घोषणा केल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी नुकतीच बेळगावात पहिली सभा घेतली होती. राहुल गांधी यांनी कर्नाटकात दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा ३,००० रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे. “बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा ३,००० रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी १,५०० रुपये प्रति महिना देणार आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा सत्तेत येऊ
भाजप आणि राज्य सरकार निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू आहे. आम्ही प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.
First-time voters have increased from 2018-19 by 9.17 lakhs in Karnataka. All young voters who are turning 18 years of age by April 1, will be able to vote in Karnataka Assembly elections: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/fNlVxVcta6
— ANI (@ANI) March 29, 2023
हे ही वाचा :
- कर्नाटक विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- Karnataka Election 2023 : दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार बरोजगारी भत्ता; कर्नाटकात राहुल गांधींची मोठी घोषणा