पुढारी ऑनलाईन: भाजप खासदार गिरीश बापट यांचं काही वेळापूर्वीच पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झालं. बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. भाजपमधील एक मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांचा पुण्यातला जनसंपर्क हा प्रचंड मोठा होता. सर्व पक्षातील नेत्यांशी गिरीश बापट यांचे चांगले संबंध होते. आता त्यांच्या जाण्याने भाजपचा पुण्यातला मोठा आधार गेला आहे असं म्हटलं तरीही काहीही वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी नगरसेवक ते खासदार अशी पदं सांभाळली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.