नाशिक : तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | पुढारी

नाशिक : तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सत्तांतरानंतर मालेगाव मध्य येथे सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जोरदार झटका दिला. नाशिकमधील ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२६) सकाळी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. ठाकरे यांच्यासह नाशिकची जबाबदारी पार पाडणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा पक्षप्रवेश सोहळा मोठा धक्क मानला जातोय.

राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्राची पहिली सभा मालेगाव येथे आयोजित करण्यात आली. या सभेसाठी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला धक्का देण्याचा परंपरा कायम ठेवली. मुंबई येथे रविवारी (दि.२६) सकाळी ११ ला ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाच्या तीघा माजी नगरसेवकांसोबत महिला जिल्हा आघाडीप्रमुख, विद्यमान उपमहानगरप्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मशालीचा त्याग करत सेनेचे धनुष्य हाती घेतले.

गेल्यावर्षी जुनमध्ये राज्यात सत्तांतर झाले. या सत्ता नाट्यानंतर ज्या-ज्या वेळी खा. संजय राऊत हे नाशिकला आले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला माेठा धक्का दिला. मध्यंतरीच्या काळात माजीमंत्री आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असताना शिंदे गटात काही प्रमुख पदाधिकारी प्रवेशकर्ते झाले. यंदा पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांचीच मालेगावमध्ये सभा आयोजित करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या सभेपुर्वीच नाशिकमधील माजी नगरसेवकांचा व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करून ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचे पाडले. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी खा. संजय राऊत व खा. विनायक राऊत हे दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. तरीही मुख्यमंत्र्यांनी खेळलेल्या चालीमुळे ठाकरे गट बॅकफुटवर गेला आहे.

शिवसेनेत यांनी केला प्रवेश

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे व ॲड. श्यामला दीक्षित या तीघांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय मनपाचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती तथा ठाकरे गटाचे विद्यमान उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, माजी उपमहानगर प्रमुख शरद देवरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील, नीलेश भार्गवे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

हेही वाचा:

Back to top button