तळेगाव दाभाडे : कुस्ती आखाड्यात तानाजी झिंजुरकेने मारली बाजी | पुढारी

तळेगाव दाभाडे : कुस्ती आखाड्यात तानाजी झिंजुरकेने मारली बाजी

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत तानाजी ऊर्फ मुन्ना झिंजुरके यांनी प्रशांत शिंदे यास घुटना डावावर पराभूत करून विजय मिळविला. यानंतर श्री डोळसनाथ महाराजचं चांगभलं म्हणत हलगीच्या गजरात कुस्तीच्या आखाड्याचा समारोप झाला.

शौकिनांनी गर्दी
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवाच्या कुस्त्याचा आखाडा दुपारी सुरू झाला. यामध्ये नामांकित मल्लांच्या 60 कुस्त्या इनामी रक्कम ठरवून अगोदरच कायम केल्या होत्या. या कुस्त्यावर ग्रामस्थांनीदेखील वैयक्तिक मोठ्या प्रमाणात इनाम व चांदीच्या गदा जाहीर केल्या होत्या. या निकाली कुस्त्या पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती.

समारोपाच्या कुस्तीसाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी त्यांचे वडील पै. विश्वनाथराव भेगडे यांच्या स्मरणार्थ 75 हजार रुपयांचा इनाम ठेवला होता. या कुस्तीमध्ये पै. तानाजी ऊर्फ मुन्ना झिंजुरके यांनी पै. प्रशांत शिंदे यांचा घुटना डावावर पराभव करून विजय मिळविला. या कुस्तीसाठी समालोचन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले होते. या आखाड्यामध्ये तळेगाव तसेच मावळ तालुक्यातील अनेकाचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पैलवानांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, आखाड्यात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचादेखील सन्मान करण्यात आला.

या वेळी महिलांच्यादेखील निकाली कुस्त्या पार पडल्या. सूत्रसंचालन कुस्ती समालोचक हंगेश्वर धायगुडे, सुनील भेगडे यांनी केले.
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या उत्सवामध्ये सुरुवातीपासून उत्सव समितीचे अध्यक्ष प्रणव भेगडे, सरचिटणीस प्रणव दाभाडे, खजिनदार अक्षय पाटोळे, प्रसिद्धीप्रमुख अश्विन माने यांनी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

Back to top button