गांधी कुटुंबीय स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात; भाजपचा टोला | पुढारी

गांधी कुटुंबीय स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात; भाजपचा टोला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गांधी कुटुंबाला दोन कायदे हवे आहेत, कारण ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात, असा टोला भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला. सत्याग्रहाच्या नावाखाली काँग्रेसवाले न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरात आंदोलन केले. त्याचा त्रिवेदी यांनी समाचार घेतला. काँग्रेसचे सत्याग्रह हे सत्याग्रह नसून दुराग्रह आहे. गांधी यांनी देशाच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यांची खासदारकी कायद्याच्या निर्णयामुळे गेली आहे, हे वास्तव आहे. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, प्रियांका गांधी-वाड्रा यांनी राहुल गांधी यांची तुलना भगवान रामासोबत केली आहे. नेहरू-गांधी कुटुंबाला त्यांनी राजा दशरथासारखे सांगितले आहे. हा कोट्यवधी राम भक्तांचा अपमान असून प्रियांका यांची ही भूमिका कदापी स्वीकार केली जाणार नाही.

दरम्यान, देशातील लोकांसाठी एक व स्वतःसाठी वेगळा कायदा असल्याचे गांधी कुटुंबाला वाटते, असा टोला भाजप नेते सुशील मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मारला आहे. तर गांधी कुटुंब हे तथाकथित गांधी कुटुंब असल्याची टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी केली. एका रणनीती अंतर्गत गांधी यांनी माफी मागितलेली नाही. गांधी कुटुंब स्वतःला राजा समजते, असेही सिंग म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button