नाशिक : अवकाळीचा द्राक्षबागांना फटका; वादळी वाऱ्यासह गारपीट

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वातावरण सतत बदल होत अजून बुधवार (दि.15) सायंकाळी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजरी लावली. तर रात्री एकच्या सुमारास ओझे, नळवाडी, म्हेळुस्के परिसरामध्ये अवकाळी पावसासह जवळ जवळ दहा मिनिटे शेंगदाण्याच्या आकाराच्या गारा पडल्यामुळे द्राक्षबागासह कांदा, गहू, हरबरा, भाजीपाला पिकांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी आधीच कर्जबाजारी झालेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बुधवार (दि.15) रात्री पडलेल्या पावसामुळे तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे आशा सर्व ठिकाणी द्राक्षबागाचे खुडे व्यापारी वर्गाने बंद केले आहे. सध्या तालुक्यात द्राक्षबागाचा हंगाम निम्म्यावर आला असून अजून तीन दिवस नाशिक नासिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे सकाळी ११ वाजे पर्यत द्राक्ष घडामध्ये पाणी साचून होते ज्या द्राक्षबागा १००% देण्यासाठी आल्या आहे व ज्या निर्यातक्षम द्राक्षबागाना पेपर लावलेले आशा द्राक्षबागाना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अजून तीन दिवस पावसाळी वातावरण असल्यामुळे पुढे किती नुकसान होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. प्रत्येक वर्षी पडणा-या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून प्रत्येक वर्षी कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अतिशय धोक्याच्या वळणावर येवून उभा आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून हजेरी लावल्यामुळे द्राक्षाच्या भावात घसरण पाहण्यास मिळत आहे. तसेच ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे आशा ठिकाणी भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यांच्या अंदाजनुसार तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्यामुळे शेतकरी राजा अवकाळी पुढे हतबल झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
- पिंपरी : महापालिका प्रशासकाने बंद दाराआड निर्णय घेऊ नयेत
- गोवा : आमदार प्रशिक्षणासाठी २५ लाखांचा खर्च!
- बारामती : अवकाळीच्या धास्तीने गहू काढणीला वेग