गोवा : आमदार प्रशिक्षणासाठी २५ लाखांचा खर्च! | पुढारी

गोवा : आमदार प्रशिक्षणासाठी २५ लाखांचा खर्च!

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळातर्फे गतवर्षी २७ आणि २८ जून रोजी आयोजित केलेल्या आमदार प्रशिक्षण कार्यशाळेसाठी २४ लाख ९६ हजार ५०० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केला होता.

या कार्यशाळेसाठी राज्य सरकारने मुंबईस्थित एनजीओ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेला २४ लाख १३ हजार १०० रुपये दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी ८० हजार रुपये दिले. आमदार उल्हास तुयेकर आणि कृष्णा साळकर यांच्या फोटोफ्रेमसाठी ३४०० रुपये खर्च करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षण कार्यशाळेत राजेंद्र आर्लेकर, डॉ. अनंत काळसे, डॉ. हरीश शेट्टी, राम नाईक, देश दीपक वर्मा आणि सतीश महान हे सहा वक्ते होते. त्यांच्या प्रवास, भोजन आणि निवास सोयींसाठी एकूण साडेचार लाख खर्च करण्यात आले. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात स्टेज सजावट आणि स्मृतिचिन्हांवर दोन लाख, आमदारांच्या तर चहापानावर पाच लाखांचा खर्च करण्यात आला.

संबंधित बातम्या

विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी ताज विवांता येथील जागेच्या भाड्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये नाही. अॅड. रॉड्रिग्स यांनी गतवर्षी २८ जून रोजी ताज विवांता येथे २७ आणि २८ जून रोजी झालेल्या आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या फाईल नोटिंग्स आणि पत्रव्यवहाराची प्रत मागितली होती. या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशीलही मागितला होता. विधिमंडळातील जन माहिती अधिकारी (पीआयओ) मोहन गावकर यांनी ही माहिती देण्यास नकार दिला. माहिती उघड केल्याने विधानसभेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, असे कारण देण्यात आले होते. त्यानंतर सचिव निर्मला उलमन यांनीही ही माहिती देण्यास नकार दिला.

पंधरा दिवसांत माहिती देण्याचे होते आदेश

अॅड. रॉड्रिग्स यांनी नंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त विश्वास सतरकर यांच्याकडे अपील केले होते.. सतरकर यांनी १३ फेब्रुवारी रोजी विधानमंडळ सचिवालयातील पीआयओला अॅड. रॉड्रिग्स यांना १५ दिवसांच्या आत आणि मोफत देण्याचे आदेश दिले होते.

• ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ला २४ लाख १३ हजार १०० रुपये
• फोटो आणि व्हिडीओग्राफीसाठी ८० हजार रुपये
• फोटो फ्रेमसाठी ३४०० रुपयांचा खर्च

Back to top button