बारामती : अवकाळीच्या धास्तीने गहू काढणीला वेग | पुढारी

बारामती : अवकाळीच्या धास्तीने गहू काढणीला वेग

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने बारामती तालुक्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. गेल्याच आठवड्यात तुरळक पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती. मात्र, पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने गहू उत्पादक धास्तावला आहे. पावसाच्या शक्यतेने गहू काढणीला वेग आला आहे. याशिवाय, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा आदी पिके या परिसरातील शेतकर्‍यांनी घेतली आहेत. अवकाळी पाऊस आल्यास या पिकांना फटका बसू शकतो. रविवारी (दि. 12) सकाळी तालुक्यात काही काळ ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

साखर कारखान्यांचा हंगामही अंतिम टप्प्यात असल्याने मोठा पाऊस झाल्यास त्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अजूनही निम्म्याहून अधिक क्षेत्रांतील गहू पिकाची काढणी झालेली नाही. हरभरा काढणीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने घरातील सदस्यच शेतात राबताना दिसत आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतीचे नुकसान झाले नसले, तरीही शेतकर्‍यांना नुकसानीची धास्ती सतावत आहे. शेतमालाचे भाव ढासळले असल्याने अपेक्षित उत्पन्न शेतकर्‍यांना मिळेनासे झाले आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. मशागतीचे वाढलेले दर, खतांच्या चढत्या किमती, मजुरांची टंचाई, यांत्रिकीकरणाचे वाढलेले दर, अपेक्षित उत्पन्न नसणे आणि लहरी हवामान यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच अवकाळीमुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

Back to top button