असे बनवा चायनीज लुंग-फंग सूप | पुढारी

असे बनवा चायनीज लुंग-फंग सूप

पुढारी ऑनलाईन – सूपमध्ये आता चायनिज सूप्सनी स्वतःची अशी खास जागा बनवली आहे. कोणत्याही चायनिज रेस्टॉरंटमध्ये गेलो की तिथे खाद्यपदार्थांची ऑर्डर देताना सूपची आर्डर आपण हमखास देतो. मेनकोर्समधील पदार्थ तयार होईपर्यंत गरमागरम, चटकदार असे समोर टेबलवर येतात आणि आपण ते मिटक्या मारतो संपवतो. हे सूप तुम्ही घरीही बनवू शकता. फार अवघड अशी रेसिपी नसल्याने या विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. जाणून घेवूया याची रेसिपी.

मनचाऊ सूप, चायनिज हॉट आणि सोर सूप असे किती तरी सूप प्रसिद्ध आहेत. पण जे चायनिज खाद्यपदार्थांचे दर्दी शौकीन आहेत, अशांची पसंती लुंग-फंग सूपला असते. काही वेळा हा सूप मेन्यू कार्डवर गायब असतो, पण जे पट्टीचे खवय्ये आहेत, ते या सूपची खास ऑर्डर देऊन तो बनवून घेतात. त्यातही नॉनव्हेज प्रेमींसाठी हा सूप खासच आहे, कारण यात चिकन आणि अंडी अशी दोन्हींची चव चाखता येते.

लुंग-फंग सूपसाठी साहित्य 

सुमारे ८ कप चिकन स्टॉक, पाव कप चिरलेले फ्लॉवर, जवळपास अर्धा कपापेक्षा थोडे जास्त चिरलेले गाजर, अर्धा कप फरसबी, १ लहान चमचा व्हिनेगर (कुकिंगसाठीचा व्हाईट), १ लहान चमचा सोयासॉस, थोडे मीठ, पाव चमचा आजिनोमोटो, पाव चमचा मिरे पावडर, चिरलेली कोथिंबीर, १ अंडे, आणि १ चमचा कॉर्नफ्लोअरची पेस्ट.

आता एका मोठ्या कढईत चिकन स्टॉक उकळण्यासाठी ठेवा आणि स्टॉकला उकळी आली की त्यात सर्व भाज्या घाला. त्यानंतर त्यात सोयासॉस, व्हिनेगर, आजिनोमोटो, मिरे पावडर, मीठ घाला. त्यानंतर भाज्या शिजू द्या. भाज्या शिजल्या की त्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला आणि सर्व स्टॉक ढवळून घ्या.

एका कपात अंडे फेटून घ्यावे. त्यानंतर उकळत्या सूपमध्ये अगदी हळूवार बारीक धारेने सूपमध्ये हे फेटलेले अंडे सोडावे. आणि अंडे घातल्यानंतर पटकन गॅस बंद करावा. हा सूप गरमच चांगला लागतो. सर्व्ह करताना त्यात कोथिंबीर घाला.

हेही वाचा : 

Back to top button