Shravan Special Food : उपवासासाठी खा राजगिरा खीर आणि कॅल्शिअमची कमतरता टाळा

Shravan Special Food : उपवासासाठी खा राजगिरा खीर आणि कॅल्शिअमची कमतरता टाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या श्रावण मास सुरू आहे. या महिन्यात काही जण संपूर्ण श्रावणमास उपवास करतात. सलग उपवास केल्याने शरीरातील हाडांची झीज होते त्यामुळे कॅल्शिअची कमतरता जाणवते. ही कॅल्शिअमची कमतरता कमी करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहो ही खास रेसिपी 'राजगिरा खीर'.

राजगिरा हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. आपल्याकडे जास्तकरून राजगिरा लाडू उपवासाला खाण्याची पद्धत आहे. मात्र, उत्तरभारतात उपवासासाठी राजगिरा खीरचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. राजगि-यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. ते आपल्या शरीरातील हाडांची झीज भरून काढते आणि कॅल्शिअमची पातळी वाढवते. विशेष म्हणजे ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे एकदा ट्राय करा –

साहित्य – राजगिरा लाह्या (बाजारात न मिळाल्यास कच्चा राजगिरा घरी आणून तो भाजून लाह्या करता येतात) एक कटोरी, अर्धा लिटर फूल क्रिम दूध, खडी साखर, (खडी साखर नसल्यास साधी साखर घालावी), किशमिश, काजू, चारोळी, वेलदोडे पूड, केशर, बादाम, पिस्ता, तूप

कृती – सर्व प्रथम दूध उकळून घ्या. त्यानंतर एका कढईत तूप टाकून काजू, चारोळी, वेलदोडे, बादाम, पिस्ता बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यानंतर पदार्थ गार झाल्यावर यांना एकत्रितपणे मिक्सरमध्ये वाटून घ्या. राजगिरा लाह्या जर तयार असतील तर त्या कमी तुपात हलकेच गरम करा. नाहीतर कच्चा राजगिरा असेल तर एका कढईमध्ये कच्चा राजगिरा टाकून भाजून लाह्या तयार करून घ्या. राजगि-याच्या लाह्या बनवताना स्वच्छ कापडाचा वापर करावा. एकावाटीमध्ये थोडे दूध काढून त्यात केसर भिजत घाला. किशमिश चांगली धुवून घ्या. खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. (मार्केटमध्ये मिळणारा खीर मसाला वापरला तरी चालेल)

आता दुधामध्ये राजगिरा लाह्या टाकून 10-ते 12 मिनिटे उकळून घ्या. नंतर खीर मसाला किंवा तयार केलेल्या सुक्या मेवाचे मिश्रण टाकून आणखी 5 मिनिटे हे मिश्रण उकळा. खीर खाली भांड्याला लागू नये यासाठी मिश्रण मधून-मधून ढवळत राहा. आता वाटलेली खडी साखर टाकून आणखी 5 मिनिटे मिश्रण ढवळा. सर्वात शेवटी दूधात भिजवलेले केसर त्या दुधासह घालून मिश्रण ढवळा. ही खीर तयार झाली आहे. खीर कटोरीमध्ये वाढताना त्यावर वरून किशमिशचे दाणे टाका…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news