उद्धव ठाकरे : ‘नवा आहे पण छावा आहे!’, नारायण राणे यांच्यावर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; श्रेणिक नरदे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष पदावर येऊन येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्षे होतील. ठाकरे घराण्यात प्रत्यक्ष राजकारणात उडी घेणारे पहिले ठाकरे आदित्य ठाकरे. त्यानंतर सेनेने ठरवून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि रिमोट कंट्रोलची परंपरा संपवली.

माणूस प्रत्यक्ष एखाद्या पदावर असतो तेव्हा तो काम करताना गांगरतो. मात्र उद्धव ठाकरे वयाच्या साठीत मुख्यमंत्री झाले. साठ वर्षे त्यांच्या घरी राजकीय लोकांची उठबस होती. उद्धव ठाकरेंचं निरीक्षण ते बघणं यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला. प्रबोधनकार आजोबा, हिंदूहृदयसम्राट, मराठी अस्मितेचे मानबिंदू असणारे वडील हा असा भरभक्कम वारसाही त्यांना लाभला.

घरातील मोठी माणसं जर कर्तृत्ववान असतील तर पुढच्या पिढीवर एक मोठा दबाव असतो. कणखर, राकट, प्रभावशाली अशा कित्येक उपमा प्रबोधनकारांना आणि शिवसेनाप्रमुखांना देता येतील. मात्र उद्धव ठाकरेंनी ना बाळासाहेबांना, ना प्रबोधनकारांना कॉपी केलं. ते उद्धव ठाकरेच राहिले.

शांत स्वभावाचे असणारे उद्धव ठाकरे यांना एवढा मोठा वारसा नसता तर ते अगदी आपल्या मुंबईतल्या सामान्य नोकरदार माणसासारखेच असते. त्यांचं सामान्य दिसणं हाच त्यांचा मोठा गुण आहे.

पक्षप्रमुखाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, तेव्हा ते थोडे चाचपडत असल्यासारखे दिसत होते. फडणवीसांनी मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची खिल्ली उडवताना त्यांचे त्या काळातले काही परमनंट डॉयलाग जसे मर्द, नामर्द, कोथळा, तलवार हे म्हणून दाखवलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी सुरवातीला या शब्दांच्या आधारे आहे ती गर्दी टिकवून ठेवायचं काम केलं होतं.

पण गेल्या दोन वर्षातले उद्धव ठाकरे हे असले काही शब्द वापरताना दिसत नाहीत. उलट ते आता ते गेले २० वर्षं प्रत्यक्ष राजकारणात असल्याएवढे प्रगल्भ वाटतात. महाराष्ट्र त्यांच्याकडे एक जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून पाहतो. हे कुणी मान्य करो अथवा न करो. मात्र हे आहेच.

ते प्रसंग कितीही बाका असो, प्रचंड संवेदनशीलतेने हाताळतात. भंडाऱ्यात जेव्हा अग्निकांड झालं आणि बालकांचा मृत्यू झाला तेव्हा ते ज्यांची बालकं त्या अग्निकांडात मृत्युमूखी पडली त्यांच्या कुटुंबीयांना भेटले. माध्यमासमोर आल्यावर ते प्रामाणिकपणे म्हणाले, मी त्या कुटुंबियांसमोर गेलो आणि हात जोडले.

अभ्यास करू, समिती नेमू वगैरे राजकीय/सरकारी भाषा त्यांच्याकडे नाही. त्यांचं बोलणं धीर देणारं आणि ओलावा असणारं मायाळू आहे.
त्याला कारणही तसंच आहे. त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी कित्येकदा असे प्रसंग पाहिलेत, ऐकलेत. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यात आणि त्याचे होणारे परिणामही पाहिलेत. त्यातून त्यांचा स्वतःचा एक अभ्यास झालाय आणि तो गेल्या दिडेक वर्षात पावलोपावली दिसतोय. कोरोना काळातले त्यांचे फेसबुक लाईव्ह बघा, किंवा पत्रकार परिषद बघा त्यातून त्यांचं 'जबाबदार' असणंच जाणवतं.

राज्यच काय देशच वाईट परिस्थितीतून जातोय.  त्यात ठाकरे नवखे. फडणवीसांना ठाकरे झेपत नाहीत हे केंद्रीय नेतृत्वाला लक्षात यायला दीड वर्षे लागली. पण त्याआधी त्यांनी राणे नावचा पर्याय ठेवला होता. राणेही सुशांतसिह प्रकरणापासून सतत स्वतःला सिद्ध करत होते. शेवटी केंद्राने राणेंची निवड केली आणि त्यांचा यथोचित राज्याभिषेक केला.

पडळकर, दरेकर, फडणवीस , चंद्रकांत पाटील हे नेते आहेत पण त्यांच्या आवाजाला मर्यादा आहेत. राणेंचं तसं काही नाही. राणे तुटून पडत असतात. पण राणेंकडून राजकीय टीकाटिप्पणीचा स्तर प्रचंड खालावला होता हे कुणीही मान्य करेल. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा विधानाचं समर्थन केलं नाही.

राणे जर रोज असे बोलत राहिले तर उद्या आणखी काही लोकही बोलतील. राणेंना मंत्रीपद मिळाल्यावर काहींना सेनाभवनावर जायचेही डोहाळे लागले होते.

उद्धव ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात नवे असतील पण राजकारणातलं त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे. केंद्राने राणे नावचा दूसरा पर्याय आजमावून पाहायचा प्रयत्न केला. पण आजच्या कारवाईने तो हाणून पाडला. आज अटकेनंतर भाजपच्या कोणत्याच नेत्याची भाषा आक्रमक नव्हती. हा जागेवर लागलेला निकाल आहे.

नवा आहे, तर तो घाबरेल, गडबडेल, चूक करेल, मग संधी साधू असं काही गणित भाजपच्या चाणक्यांनी घातलं होतं. ते मोडीत निघून उद्धव ठाकरेंची पकड आणखी मजबूत झाली.

उद्धव ठाकरे संयमी आहेत. ज्या माणसाने साठ वर्षे वाट पाहिली तो साधासुधा नाही. तो अत्यंत तयारीचा माणूस आहे हे भाजपच्या ध्यानी नाही. त्यांना नवा समजणे ही मोठी चूक आहे.

उद्धव ठाकरेंकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं 'नवा आहे पण छावा आहे!'

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news