नारायण राणे यांची अटक की, सेना-भाजप संभाव्य युतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’? | पुढारी

नारायण राणे यांची अटक की, सेना-भाजप संभाव्य युतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

मुंबई ; विवेक गिरधारी

सोमवारी संध्याकाळी महाडमध्ये एका हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात केलेले वक्‍तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवले आणि मंगळवारी राज्यभर राणेविरोधाचा भडका उडाला. राणे आक्षेपार्ह बोलले आणि अटकेची कारवाई झाली इतके मर्यादित हे प्रकरण नाही. शिवसेना-भाजप युतीच्या थोड्याबहुत शक्यताही संपुष्टात आणणारा हा एक ‘करेक्ट कार्यक्रम’ राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृह खात्याने केला. आता आगामी निवडणुकांचे रिंगण त्यानुसार आखले जाईल.

आधी राणे नेमके काय बोलले होते ते पाहू…

“त्यांचा अ‍ॅडव्हायझर कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अ‍ॅडव्हाईझ करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसर्‍या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावे. त्या दिवशी नाय का, किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय? देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?”

हेच ते राणेंचे वादग्रस्त विधान महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ घडवणारे ठरले. राणेंना अटक झाली. अटकेनंतरची न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालत राहील. या प्रक्रियेचे तसे राजकीय परिणाम संभवत नसतात. राणे यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी या विधानाचे आणि अटक कारवाईचे चार ठोस राजकीय अर्थ मात्र संभवतात.

ते असे –

1. राणे आणि शिवसेना यांच्यात हाडवैर असल्याने वरकरणी हा संघर्ष नारायण राणे विरुद्ध सेना असा दिसतो आणि तो आता टोकाला पोहोचला आहे. मात्र राणे आता भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. राणेंच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्षही विकोपाला गेला आणि या दोन प्रदीर्घ मित्रांची पुन्हा युती होण्याची शक्यताच संपुष्टात आली.

2. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्‍लीला गेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा बंद दाराआड झाली. तेव्हा सेना-भाजप एकत्र येऊ शकतात, या शक्यतेने राष्ट्रवादीही हैराण झाली होती. तेव्हापासून सेना-भाजपचे आणखी चांगले कसे बिनेल या दिशेने राष्ट्रवादीचे काम सुरू होते. त्यानुसार राणे यांचे मुख्यमंत्र्यांवरील विधान शिवसेनेइतकेच राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्याही जिव्हारी लागले आणि भाजपच्या वर्मी घाव बसेल, अशा तर्‍हेने राणे यांना जेवण करतानाच अटक करण्यात आली.

सेना विरुद्ध भाजप संघर्ष आणखी चिघळावा याची काळजी घेत राष्ट्रवादीकडील गृहखात्याने राणे यांचा संगमेश्‍वरमध्येच अटकेचा घाट तडीस नेताना सेना-भाजप युती होण्याच्या संभाव्य शक्यतेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. या कार्यक्रमाचे श्रेय आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना दिले जाईल. मात्र या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार ठरले ते राणे. त्यांनीच या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे औचित्य गृहखात्याला म्हणजेच राष्ट्रवादीला पुरवले.

3. फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची रणधुमाळी होऊ घातली आहे. या निवडणुकीची सूत्रे भाजपने आधी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे दिली. मागच्या निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार आशिष शेलार हे तसे सक्रिय असले तरी त्यांच्याकडे पालिका निवडणुकीचे नेतृत्व दिलेले नाही. मात्र नारायण राणे यांचा केंद्रात शपथविधी होताच शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी राणेंना मुंबईत उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

नवीन मंत्र्यांच्या ज्या जनआशीर्वाद यात्रा महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघाल्या, त्यात राणेंची यात्रा नेमकी मुंबईतून कोकणात गेली. मुंबईतील सेनेचे बालेकिल्‍ले पिंजून काढताना राणेंचा मूड आक्रमक होता. उद्धव ठाकरे यांचा सतत एकेरी उल्‍लेख, अक्‍कल काढणे, अनुभव मोजणे इथेच राणे थांबले नाहीत. महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटांचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी त्यांनी जोडला. ‘पांढर्‍या पायाचा’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांचा उल्‍लेख करताना राणे एक-दोनदा घसरले.

शिवसेना प्रमुखांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शिवसेनेचा भगवा महापालिकेवरून खाली खेचण्याचा निर्धार राणे यांनी बोलून दाखवला. तिथेच खरे तर राणे विरुद्ध सेना संघर्षाची ठिणगी पडली होती. राणे सेनाप्रमुखांच्या समाधी स्थळी गेलेले शिवसैनिकांना रुचले नाही. राणे तेथून जाताच शिवसैनिकांनी समाधी व परिसराचे शुद्धीकरण केले. त्याची दखल घेत, ‘आधी मन शुद्ध करा’, असा सल्‍ला देत राणे यांनी सेनेला अंगावर घेत आपली यात्रा सुरू ठेवली.

4. राणे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली आहे. सभ्यतेच्या मर्यादेत बसणार नाही, अशी टीकाही केली. मात्र कानाखाली चढवण्याची भाषा टोकाला गेली आणि राज्यभरात शिवसेना चवताळून उठली. यानिमित्ताने धुरळा उठला, राडा झाला. महापालिकांच्या महासंग्रामाचे रिंगणच आखले गेले.

अन्यथा नोव्हेंबर 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर बसला तेव्हापासून आंदोलन नावाचा काही प्रकार असतो याचा विसरच सेनेला पडला होता. आंदोलनाचे हे हत्यार राणे यांनी स्वतःच शिवसैनिकांच्या हाती पुन्हा दिले आणि सेनेच्या राज्यभरातील शाखा रस्त्यांवर उतरल्या. इथून पुढे असे राड्यांचेच दिवस आहेत याची खूणगाठ महाराष्ट्राने जरूर बांधावी.

5. नाशकात उभ्याने आणि मुंबईत बसून चर्चा झाली तरी भाजप-मनसे युतीची बोलणी पुढे सरकली नाहीत. मराठी माणसाला कळणार नाही अशा बेताने राज ठाकरे यांनी मराठी आणि भूमिपुत्रांचा नाद सोडावा आणि राष्ट्रीय व्हावे, अशी भाजपाची अट आहे.

राणेंच्या अटकेने सेनेशी पार बिनसल्याने मुुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपला एकमेव मित्र म्हणून मनसेचीच साथ मिळू शकते. मनसेशिवाय पर्याय नाही अशी स्थिती राणेंच्या अटकेने भाजपसमोर निर्माण केली. आता ही युती बिनशर्तही होऊ शकेल. तसे झाले तर राणेंची अटक ही मनसेसाठी इष्टापत्ती ठरू शकेल.

Back to top button