सोलापूर : आषाढीपूर्वी मंदिरांसह मठांचे फायर ऑडिट | पुढारी

सोलापूर : आषाढीपूर्वी मंदिरांसह मठांचे फायर ऑडिट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापलिकेचे अग्निशमन विभागाचे केदार आवटे यांची इन्सिडट कंमाडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांनी पंढरपूर विठ्ठल मंदीराचे फायर अ‍ॅडिट करून यात्रा काळात संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पंढरपूरातील विविध मठ आणि मंदिराचे आता फायर अ‍ॅडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे पशु संवर्धन विभागाचे उपायुक्त एन सोनवणे यांना पंढरपूरातील भटक्या जनावरांचा आणि कुत्रे तसेच डुक्करांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आषाढी यात्रेसाठी यंदा 12 ते 15 लाख भाविक येणार असल्याने जिल्हा प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे. वारीकाळात कोणालाही आडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र इन्सिडंट कमांडर म्हणून स्वतंत्र अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्वाधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.
पंढरपूरात पाणीपुरवठा आणि टँकर पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे देण्यात आली आहे.लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी तसेच नदीपात्राती वाहतूक बोटी याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना यात्रा काळात येणार्‍या पालख्यांना लागणार विद्युत पुरवठा तसेच पाणीपुरवठ्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त एन. ए. सोनवणे यांना पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरात असलेली भटकी जनावरे तसेच भटक्या कुत्र्यामुळे आणि डुकरामुळे वारकर्‍यांना त्रास होवू नये, यासाठी अशा भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबादारी सोपविण्यात आलेली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांना यात्रा काळात पंढरपरातील गॅस, पेट्रोल पुरवठा तसेच डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना यात्रा काळात कोणत्याही भागात मद्य विक्री होणार नाही, तसेच वारकर्‍यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांना शहरात यात्रा काळात सुरक्षित अन्न पुरवठा व्हावा, तसेच कोणत्याही अन्न पदार्थामध्ये भेसळ होणार नाही, याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यात्रेत उपलब्ध होणार 110 बोअरमधून पाणी यात्राकाळात कोठे ही पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी पंढरपूर शहरातील नगरपालिका आणि काही ठिकाणी खाजगी बोअर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. वीज बिल थकल्याने या बोअर बंद होत्या. त्याचे सुमारे 28 लाख रुपयांचे बिल नगरप्रशासनाने भरले. त्यामुळे शहरातील जवळपास 110 बोअर मधून यात्रा काळात पाणी उपलब्ध होणार आहे. शहरात टँकरव्दारे ही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Back to top button