‘तेलंगणाचे सर्व जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडणार; ८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण’ | पुढारी

'तेलंगणाचे सर्व जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडणार; ८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण'

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा हे प्रगतीशील आणि समृध्द राज्य आहे. पाणी, ऊर्जा, दळणवळण व संदेशवहन तसेच कृषी व ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय या देशाचा विकास होणार नाही. यासाठी कृषी व ग्रामीण भागात अधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे. तेलंगणातील ३३ पैकी ३२ जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडण्यात आले आहेत, केवळ एकच जिल्हा जोडायचा आहे. पण हे सर्व जिल्हे लवकरच राष्ट्रीय महामार्गाने जोडले जातील, असा विश्वास केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

तेलंगणातील ८ हजार कोटींच्या १९ महामार्गांच्या प्रकल्पांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, विमुलाप्रसाद रेड्डी व तेलंगणा राज्याचे अन्य मंत्री, खासदार व आमदार उपस्थित होते. हैद्राबाद येथे आज सकाळी हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी गडकरी पुढे म्हणाले, तेलंगणातील आजच्या एकूण सर्व प्रकल्पांची लांबी ४६० किमी असून, त्यासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २०१४ मध्ये राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी फक्त २५११ किमी होती. गेल्या ३१ मार्च २०२२ पर्यंत महामार्गांच्या लांबीत १०० टक्के वाढ होऊन, ती ५ हजार किमीपर्यंत झाली आहे. आगामी काळात यात अधिक वाढ होणार आहे. तेलंगातील सर्व जिल्हे राष्ट्रीय महामार्गाने जोडले जाणार आहेत. तसेच सन २०२४ पर्यंत तेलंगणा राज्यात ३ लाख कोटी रुपये खर्च करुन राष्ट्रीय महामार्गांच्या पायाभूत सुविधा तयार करण्यात येतील, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या महामार्गांच्या कामांमुळे आंतरराज्य कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. तसेच तेलंगणातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये अखंड वाहतूक शक्य होणार आहे. व्यापारात वाढ होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व हैद्राबाद आणि तेलंगणाचे नागरिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

हेही वाचलत का ?

Back to top button