Sri Lanka crisis : श्रीलंकेत मोठी उलथापालथ, महिंदा राजपक्षेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय | पुढारी

Sri Lanka crisis : श्रीलंकेत मोठी उलथापालथ, महिंदा राजपक्षेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय

कोलंबो; पुढारी ऑनलाईन

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा (Sri Lanka crisis) सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lankan president Gotabaya Rajapaksa) यांनी त्यांचे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Sri Lanka’s Prime Minister Mahinda Rajapaksa) यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास सहमती दर्शवली आहे. “राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी, नवीन पंतप्रधान आणि संसदेतील सर्व पक्षांचा समावेश असलेले मंत्रिमंडळ निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय परिषद नियुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे,” असे मैत्रीपाला सिरिसेना यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सांगितले.

श्रीलंकेत सध्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थिती आहे. यामु‍ळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह राजपक्षे कुटुंबातील नेत्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. देशभरात याआधी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

परकीय कर्जाचा डोंगर, लॉकडाऊन, तीव्र महागाई, इंधन पुरवठ्यातील तुटवडा, परकीय चलन साठ्यात झालेली घसरण आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. श्रीलंकेला या वर्षी ७ अब्ज डॉलर परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोरोना काळापूर्वीच संकटात सापडली होती. लॉकडाउनमुळे त्यात आणखी भर पडली. त्याचा असंघटित क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. ज्यात सुमारे ६० टक्के कर्मचार्‍यांचा वाटा आहे.

श्रीलंकेत महागाई (Sri Lanka crisis) प्रचंड वाढलेली आहे. कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक उत्पन्‍नात मोलाचा वाटा असलेला पर्यटन उद्योग बुडालेला आहे. कोरोना हाताळण्यात खजिना रिकामा झाला आहे.

पर्यटनावर श्रीलंकेतील २५ लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. देशाच्या उत्पन्नात पर्यटनाचा १० टक्केहून अधिक वाटा आहे. यातून देशाला ५ अब्ज डॉलर (जवळपास ३७ हजार कोटी रुपये) परकीय चलन मिळते. कोरोनामुळे हा उद्योग कोलमडलेला आहे.

हे ही वाचा :

Back to top button