“मी संघात त्यांना नको होतो”, दानिश कनेरियाचा शाहिद आफ्रिदीवर गैरवर्तनाचा आरोप | पुढारी

"मी संघात त्यांना नको होतो", दानिश कनेरियाचा शाहिद आफ्रिदीवर गैरवर्तनाचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीवर गैरवर्तनाचा आरोप करत त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याची विनंती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. दानिश कनेरियावर २०१३ साली स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता, ज्यामध्ये तो दोषी आढळला होता. दानिश कनेरियाने दिलेल्या माहितीनूसार, पाकिस्तानचा कर्णधार आफ्रिदीने त्याच्याविरुद्ध कट रचला होता.

हिंदू असल्याने माझ्यावर अन्याय!

कनेरियाने एका माध्यमाच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, संघात मला हिंदू आहे म्हणून माझ्यासोबतची इतर सहकाऱ्यांची वागणूक चांगली नव्हती. काही अधिकाऱ्यांनी माझ्यावर दबाव आणल्यानंतर त्यांनी याबाबत बोलणे बंद केले. पण हो, माझ्या बाबतीत हे घडलं. शाहिद आफ्रिदीने मला नेहमीच निराशाजनक वागणूक दिली. आम्ही एकाच संघासाठी एकत्र खेळायचो, पण मला मैदानाबाहेर ठेवण्याची त्याची रणनीती असायची. तो मला एकदिवसीय स्पर्धा खेळण्याची संधी देत नसतं.

शोएब अख्तरला मी संघात यावे असे वाटत नव्हते

दानिश कनेरियाने मुलाखतीमध्ये शोएब अख्तर बद्दलचे मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “मी संघात असावे अशी त्याची इच्छा नव्हती. त्याच्या खोट्या वागणूकीला नेहमी सामोरे जावे लागत असे. पण, माझे लक्ष फक्त क्रिकेटवर होते आणि मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो. शाहिद आफ्रिदी इतर खेळाडूंकडे जायचा आणि त्यांना माझ्याविरुद्ध भडकावायचा. मी चांगले काम करत होतो आणि त्यांना माझा हेवा वाटत होता. मी पाकिस्तानसाठी खेळलो याचा मला अभिमान आहे. यासाठी मी पीसीबीचा आभारी आहे.” असं मत त्याने व्यक्त केलं.

हा माजी क्रिकेटपटू म्हणतो की जर तो आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळला नसतो तर 18 एकदिवसीय सामन्यांपेक्षा खूप जास्त सामने खेळू शकलो असतो. कराचीत जन्मलेल्या या खेळाडूने असेही सांगितले की तो कधीही कोणत्याही प्रकारच्या स्पॉट-फिक्सिंगमध्ये सामील नव्हता. तो पुढे म्हणाला, “माझ्यावर स्पॉट फिक्सिंगचे काही खोटे आरोप करण्यात आले. माझे नाव या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीशी जोडले गेले. आफ्रिदीसह इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही तो मित्र होता. पण मी त्यात का गुंतलो ते कळत नाही. मी फक्त पीसीबीला बंदी उठवण्याची विनंती करू इच्छितो, जेणेकरून मी माझे काम करू शकेन.”

दानिश कनेरियाची क्रिकेट कारकिर्द

2000 ते 2010 दरम्यान, कनेरियाने 61 कसोटी सामने खेळले आणि 34.79 च्या सरासरीने 261 विकेट घेतल्या आहेत. त्याने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 45.53 च्या सरासरीने 15 बळी घेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. तो पाकिस्तानकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि वसीम अक्रम (414), वकार युनूस (373) आणि इम्रान खान (362) यांच्या मागे तो चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप प्रो-लीग सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंगच्या दोन आरोपांवरून त्याच्यावर क्रिकेटमधील करिअरवर आजीवन बंदी घातल्यानंतर त्याची कारकीर्द 2012 मध्ये रुळावरून घसरली.

हेही वाचा

Back to top button