सोलापूर : आजपासून नवे निर्बंध; अंत्यविधीसाठी २०, कार्यक्रमांना ५० जणांनाच परवानगी | पुढारी

सोलापूर : आजपासून नवे निर्बंध; अंत्यविधीसाठी २०, कार्यक्रमांना ५० जणांनाच परवानगी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना-बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवे निर्बंध घालून नव्याने आदेश जारी केले आहेत. दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू राहणार आहे.

नवीन लागू केलेल्या निर्बंधामध्ये पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित फिरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी 20 आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता शासकीय कार्यालयांमध्येही गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने काही फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अधिकार्‍यांनी एकत्रित येऊन बैठका घेण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारेच मिटिंग आणि बैठका घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शासकीय व खासगी कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी वर्क फॉर्म होम या पध्दतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, कोंचिग क्‍लासेस, स्विमिंग पूल, स्पा सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. जीम एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांच्या उपस्थितीत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हेअर कटिंग दुकाने, ब्युटीपार्लर आणि सलून दुकाने रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. याठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीनेच सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा नियम व अटींच्या अधिन राहून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मनोरंजन, उद्याने, प्राणीसंग्रहालये, किल्ले अन्य मनोरंजनाची ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहेत. शॉपिंग सेंटर, मार्केट, रेस्टॉरंट, उपहारगृहे, नाट्यगृहे, सिमेना थिएटर्स हे 50 टक्के क्षमतेच्या प्रमाणात सुरू राहतील. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवास सुरू राहील. मात्र, यामध्ये कोरोना प्रतिबंधाच्या अटी व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

यूपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इत्यादींव्दारे घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी काही मागदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यांच्या तारखा आणि वेळा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. त्या वेळेवर पार पडतील. मात्र, ज्यांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत त्यांना शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई

जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्‍यासांठी ठोस कारण आवश्यक असणार आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, अत्यावश्यक सेवा, विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे येण्यासाठी वैध दिनांकाचे तिकीट अथवा पास तसेच विविध कामांसाठी बाहेर पडणार्‍या कर्मचार्‍यांना त्या त्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठीचे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. त्या लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्यक कामांची निर्बंधातून सुटका

शहरात नागरिकांना पहाटे 5 ते रात्री 11 या कालावधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली असल्याचे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले आहेत.

भाजीपाला, फळविक्रेते, दुकानदार व आठवडी बाजारमधील विक्रेते यांचे लसीचे दोनही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. त्यांनी 10 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत चाचणी करून घेणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस 15 जोनवारीपासून 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहतील. ज्यामध्ये रुग्णालये, निदान केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय, विमा कार्यालये, मेडिकल, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्यसेवा व या सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल, लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी संबंधित उत्पादन व वितरण यांना परवानगी आहे

हे चालू राहणार

व्हेटरीनरी हॉस्पिटल, अ‍ॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फूड शॉप्स, वन विभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज, एव्हिएशन आणि संबंधित सेवा, एअरलाईन्स, विमानतळ देखभाल, कार्गो ग्राऊंडसेवा, खानपान, इंधन, सुरक्षा, किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, मटण, चिकन, अंडी, मासे दुकाने, बँका, पतसंस्था.

विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवावयाचे उपक्रम, प्रशासकीय कामकाज व शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज, शालेय शिक्षण विभाग हे 50 टक्क्यांनुसार सुरू राहतील.

मनोरंजन, उद्याने, प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणी 1 कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे, शॉपिंग मॉल हे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील.

पाणीपुरवठा सेवा, शेतीसंबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती व देखभाल.
हे रात्री बंद राहणार

बाजार, रेस्टॉरंट, उपहारगृहे पूर्णपणे बंद राहतील. नाट्यगृहे, सिनेमा थिएटर्स, आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास, माल वाहतूक, औद्योगिक, बांधकाम हे रात्री 10 ते सकाळी 8 या कालावधीत आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्याचे आयुष्य मोगरा शेतीने बनवले सुगंधित

Back to top button