

White House Correspondents' Dinner shooting
वॉशिंग्टन: वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री सुरक्षेची एक मोठी चूक समोर आली. 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थानी हलवले. ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.
या कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ देखील उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी या सर्व बड्या नेत्यांना तातडीने तेथून बाहेर काढले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने गोळ्या झाडल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुमारे ५ ते ८ गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला.
गोळीबार सुरू होताच हॉलमध्ये उपस्थित असलेले शेकडो पत्रकार आणि दिग्गज व्यक्तींनी जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली आश्रय घेतला. 'सिक्रेट सर्व्हिस'चे जवान ओरडून लोकांना बाजूला होण्यास आणि खाली वाकण्यास सांगत होते. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण बँक्वेट हॉलला वेढा घातला असून 'नॅशनल गार्ड'च्या जवानांनीही इमारतीचा ताबा घेतला आहे.
हॉटेलमधून लोकांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली, मात्र कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हल्लेखोर कोण होता आणि त्याने हे कृत्य का केले, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. परिसरात सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
व्हाईट हाऊस डिनरदरम्यान झालेल्या अचानक गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आणि हल्लेखोराला पकडण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ही घटना पूर्णपणे अनपेक्षित होती, परंतु सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली.
एक व्यक्ती अनेक शस्त्रांसह सुरक्षा तपासणी नाक्याच्या (Security Checkpoint) दिशेने आली होती, परंतु सतर्क सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळल्याचेही त्यांनी नमूद केले.
या घटनेत पारदर्शकता राखण्यासाठी ट्रम्प यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये हल्लेखोराच्या हिंसक हालचाली आणि सुरक्षा दलांची जलद कारवाई दाखवण्यात येईल, जेणेकरून जनतेला सत्य परिस्थिती समजेल. हा हल्ला देशाच्या संविधानावर असल्याचे सांगत, सुरक्षा यंत्रणांनी देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण जबाबदारीने आणि धैर्याने काम केल्याचे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "वॉशिंग्टन डीसीमध्ये शनिवारची संध्याकाळ ही एक अत्यंत असामान्य आणि तणावपूर्ण होती. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात आले असून, कार्यक्रम पुढे सुरू ठेवावा असा सल्ला आपण दिला आहे. अंतिम निर्णय सर्वस्वी कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांचा असेल. सुरक्षा यंत्रणा लवकरच यावर निर्णय घेतील, परंतु काहीही झाले तरी ही संध्याकाळ पूर्वीसारखी राहणार नाही आणि कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा लागेल, असेही त्यांनी मान्य केले.