

Donald Trump sparks controversy by reposting Michael Savage's racist rant
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी असलेला एक मजकूर सोशल मीडियावर रिपोस्ट केला आहे. रेडिओ होस्ट मायकल सेवेज यांनी एक पत्र शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि चीनचा उल्लेख 'नरकाचे द्वार' असा केला होता. ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. " भारत आणि चीन दोन आशियाई देशांतील लोक नव्या महिन्यात बाळंतपणासाठी अमेरिकेत येतात आणि येथील कायद्यामुळे त्यांना झटपट अमेरिकन नागरिकत्व मिळते," असा आरोप सॅवेज यांनी केला होता.
CNBC ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी "जगात अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणताही देश जन्मजात नागरिकत्व देत नाही" असा खोटा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सॅवेज यांची ही वर्णद्वेषी पोस्ट शेअर केली. वास्तविक पाहता, कॅनडा, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देशांसह जगातील सुमारे ३६ देश त्यांच्या भूमीवर जन्मलेल्या व्यक्तींना स्वयंचलित नागरिकत्व प्रदान करतात. डोनाल्ड ट्रम्प दीर्घकाळापासून अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्व संपवण्याची मागणी करत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, त्यांनी विशिष्ट परिस्थितीत अमेरिकेत जन्मलेल्यांना स्वयंचलित नागरिकत्व देणे थांबवणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सॅवेज यांच्या 'सॅवेज नेशन' या पॉडकास्टची ट्रान्सस्क्रिप्ट आणि व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या जन्मजात नागरिकत्वावरील युक्तिवादावर टीका करण्यात आली आहे.
मायकल सॅवेज यांनी अमेरिकेत जन्मलेल्या बिगर-नागरिकांच्या मुलांना मिळणाऱ्या स्वयंचलित नागरिकत्वावर आक्षेप घेतला होता. हा निर्णय न्यायालयावर न सोडता त्यासाठी राष्ट्रीय जनमत चाचणी घेण्याची मागणी त्यांनी केली. सॅवेज यांनी आपल्या पत्रात लिहिले की, "येथे जन्मलेले बाळ लगेच नागरिक बनते आणि त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्या तरी नरकातून येथे घेऊन येतात." या पत्रात भारतीय आणि चिनी स्थलांतरितांचे वर्णन "लॅपटॉप घेतलेले गुंड" असे करण्यात आले असून त्यांनी "आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे" असे म्हटले आहे.
"या लोकांनी माफिया कुटुंबांपेक्षाही या राष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे. त्यांनी आमची लूट केली, आम्हाला दुय्यम वागणूक दिली आणि तिसऱ्या जगाला विजयी केले," असा दावा सॅवेज यांनी केला. "मी पूर्वी भारतातील भारतीयांचा मोठा समर्थक होतो, पण नंतर माझ्या लक्षात आले की कॅलिफोर्नियातील हाय-टेक कंपन्यांमध्ये 'श्वेतवर्णीय' व्यक्तीला नोकरी मिळण्याची शक्यता शून्य आहे. तिथे केवळ भारतीय किंवा चिनी असणे आवश्यक आहे कारण तिथली सर्व यंत्रणा त्यांच्याच हातात आहे." सॅवेज यांनी असाही आरोप केला की, सध्याच्या व्यवस्थेचा गैरफायदा "बर्थ टुरिझम" आणि कल्याणकारी योजनांसाठी घेतला जात आहे. आधुनिक स्थलांतराच्या संदर्भात अमेरिकन संविधान आता जुने झाले आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला होता.
कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन संविधानातील १४ वी दुरुस्ती जन्मजात नागरिकत्वाची हमी देते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 'ट्रम्प विरुद्ध बार्बरा' या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला, ज्यामध्ये ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. या विषयावरील आगामी निकालावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, "जर त्यांनी जन्मजात नागरिकत्वाच्या विरोधात (देशाच्या हिताच्या विरोधात) निकाल दिला, तर अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अमेरिका आपली प्रतिष्ठा गमावेल!"